स्थैर्य, पुणे, दि.२: पुण्यातील एका तरुणीला कडव्या विचारांपासून परावृत्त करण्याचा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दोनदा प्रयत्न करुनही ती पुन्हा ‘इसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय तपास एजन्सीने (एनआयए) याबाबत माहिती दिली आहे.
एनआयएच्या माहितीनुसार, सादिया अन्वर शेख असं या महिलेचं नाव असून ती येरवडा येथील रहिवासी आहे. सुरुवातीला सन २०१५ मध्ये जेव्हा ती अल्पवयीन होती तेव्हा आणि त्यानंतर सन २०१८ मध्ये पोलीस यंत्रणांनी तिला कडव्या विचारांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला समजावण्याचा काहीही उपयोग झाला नाही. तिने पुन्हा ‘इसिस’च्या वतीने कट-कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला जुलै महिन्यांत एनआयएने अटक केली आणि सप्टेंबर महिन्यांत तिच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले.
सादिया सन २०१५ पासून एनआयएच्या रडारवर आहे, जेव्हा ती केवळ १५ वर्षांची होती. तीने वारंवार आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कडव्या विचारांचा मजकूर पोस्ट केल्याचे दिसून आले होते. इस्लामिक धर्मप्रचारक झाकिर नाईक हा तिचा एक प्रेरणास्त्रोत आहे, असं एनआयएनं चार्जशीटमध्ये म्हटलं आहे.
एनआयएने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे की, ‘सादिया ही विविध दहशतवादी गटांच्या एजंटच्या संपर्कात होती. यामध्ये इस्लामिक स्टेक खोरासन प्रोव्हिन्स (आयएसकेपी), इस्लामिक स्टेट इन जम्मू अँड काश्मीर (आयएसजेके), अल कायदा, पाकिस्तानातील अन्सार गझवात-उल-हिंद (एजीएच) तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशांमधील एजन्टच्या ती संपर्कात होती. तसेच फिलिपाईन्स, कारेन आयशा हमिदोन येथील इस्लामिक स्टेट्सच्या एका ऑनलाइन मोटिव्हेटरच्याही ती संपर्कात होती. या लोकांनी अनेक भारतीय तरुणांना कडव्या विचारांचं बनवलं आहे. एनआयएच्या अधिका-यांनी एप्रिल २०१८ मध्ये मनिलाला जाऊन हमिदोनला याबाबत विचारणा केली होती.