
स्थैर्य, कोरेगाव, दि. ५ : आम्ही चोर्या करतो, याच्या खबरी पोलिसांना देतो, या संशयावरुन फासेपारधी समाजातील मालगाव, रेवडी व आरफळ येथील युवकांनी दरे, ता. कोरेगाव येथील फासेपारधी समाजातील युवक विजय काज्या काळे वय ३०, याच्या मांडीवर धारदार लोखंडी बरच्याने वार करुन खून केला. ही घटना रविवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास दरे येथील माळावर फासेपारधी पालासमोर घडली. याप्रकरणी ९ जणांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, दरे, ता. कोरेगाव येथे माळावर विजय काज्या काळे हा ३० वर्षीय युवक पाल बांधून राहत आहे. त्याच्या समाजातील मालगाव, रेवडी व आरफळ येथील युवकांना तो पोलिसांचा खबरी असल्याचा दाट संशय होता. आपण चोर्या करतो, याची माहिती तोच पोलिसांना देतो, असा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचा राग होता.
रविवारी सकाळी ११. ३० च्या सुमारास अशोक जमन्या भोसले, दर्या खटपट्या भोसले, परिवार विनोद भोसले, संच्या गब्बर भोसले, समीर गब्बर भोसले, अक्ष्या शेज्या भोसले (सर्व. रा. मालगाव, ता. सातारा), अत्याचार मुजेस काळे, अतिक्रमण मुजेस काळे (दोघे रा. रेवडी, ता. कोरेगाव) आणि नाना पाटेकर (रा. आरफळ, ता. सातारा) हे नऊ जण दरे येथे गेले. त्यांनी विजय काज्या काळे याला तु पोलिसांना आम्ही चोर्या केल्याच्या खबर्या देतोस, असे म्हणत हाताने आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात त्यांच्यापैकी काही जणांनी विजय याचे हात पाठीमागे जखडून ठेवले आणि काही जणांनी लोखंडी बरच्याने त्याच्या मांडीवर जोरदार वार केले. या हल्ल्यामध्ये विजय हा गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. वडूजचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी, कोरेगावचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी घटनास्थळी भेट देऊन सातारारोड पोलीस दूरक्षेत्राच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना तपासकामी सूचना दिल्या. याप्रकरणी मृत विजय याचे वडील काज्या सावता काळे याने फिर्याद दिली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.