पाणी भरताना मोटारीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ डिसेंबर २०२१ । म्हसवड। म्हसवड येथे मंगळवारी रात्री ९.५० वाजता खासबाग मळ्यात नळाला पाणी आले म्हणून पाण्याची ईलेक्ट्रीक मोटार लावत असताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. महेश शंकर लिंगे असे मयताचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी मंगळवारी रात्री ९.५० वाजता खासबाग मळा परिसरातील लिंगे वस्तीवर राहणारे शेतमजूर कुटुंब शेती व मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करते. सहा महिन्यापूर्वी महेश यांचा विवाह म्हसवड येथील दहिवडे मळा येथील सदाशिव दहिवडे यांच्या मुलीबरोबर झाला होता. सर्व काही व्यवस्थीत सुरु असताना काळाने अचानक घाला घालून या सुखी संसाराला नजर लागावी असा प्रकार काल रात्री ९.५०ला घडला. आठ दिवसातून एकवेळ पाणी येते म्हणून मिळेल तेवढे पाणी साठवण्यासाठी पाण्याची मोटार लावून पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून महेश बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी रात्री १०.३० च्या दरम्यान नेण्यात आले. मात्र हाॅस्पिटलमधील एकही डाॅक्टर उठला नाही. एक डाॅक्टर उठला तोपर्यंत बराच वेळ निघुन गेला होता. यानंतर महेश यांना प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करुन मयत घोषीत केले. शवविविच्छेदन करण्यासाठी दहिवडीला रात्री ११.३० वाजता नेण्यात आल्यानंतर पहाटे महेश यांचा मृतदेह लिंगे परिवाराच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर सकाळी आठ वाजता शोकाकुल वातावरणात महेश लिंगे यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!