
स्थैर्य, फलटण, दि. १९: छत्रपती शिवाजीराजे भोसले हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. किल्ले रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. शिवाजी महाराज हे कधीही जाती पतीच्या राजकारणाला थारा देत नव्हते. आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर मार्गक्रमण करणे आवश्यक असल्याचे मत फलटण येथील जेष्ठ विधीतज्ञ दीपक रुद्रभटे यांनी व्यक्त केले.
फलटण येथील सर्वात जुन्या व ऐतिहासिक असलेल्या छत्रपती शिवाजी वाचनालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती येथे आयोजित कार्यक्रमात जेष्ठ विधीतन्य दीपक रुद्रभटे बोलत होते.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले, असेही जेष्ठ विधीतज्ञ दीपक रुद्रभटे यांनी स्पष्ट केले.
यावेळी छत्रपती शिवाजी वाचनालयाचे अध्यक्ष विधीतज्ञ अजित शिंदे व संचालक विलासराव बोरावके यांचेही मनोगत झाले.
प्रारंभी जेष्ठ विधीतज्ञ दीपक रुद्रभटे यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी अध्यक्ष विधीतज्ञ अजित शिंदे, संचालक विलासराव बोरावके, रवींद्र बर्गे, रवींद्र फौजदार, सुभाष भांबुरे, महेश साळुंखे, अंकुश गंगतिरे, सुनील पवार, मंगेश पवार यांच्यासह वाचक व परीसरातील नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकृष्ण देशपांडे यांनी केले तर शेवटी आभार सुभाष भांबुरे यांनी मानले.