दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२४ | साखरवाडी | तालुक्याच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या सहकारी संस्था स्व. मालोजीराजे, स्व. कृष्णचंद्र भोईटे, स्व. चिमणराव कदम, स्व. सुभाष शिंदे, स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये कार्यरत राहणाऱ्या सर्व सहकारी संस्था तुम्ही ताब्यात घेऊन मोडकळीस आणल्या व तुमच्या स्वतःच्या असणाऱ्या संस्था या तुम्ही चालवायला दिल्या आहात. कारण तुम्ही श्रीमंत आहे. तर बारामती तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व सहकारी संस्था ह्या मी स्वतः चालवतो; यासोबतच कारखान्यामध्ये सुद्धा माझे व्यक्तिगत लक्ष असते कारण मी श्रीमंत नाही! असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लगावला.
साखरवाडी बाजार तळावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे फलटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सभेमध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार बोलत होते. यावेळी खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फलटण तालुक्यामध्ये विकासासोबत सहकारी संस्था पुनर्जीवन करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करण्यात येईल. यासोबतच मी मी या गोष्टी हवेमध्ये बोलत नाही. मी गोष्टी बोलत असताना माझ्या तालुक्यांमध्ये किंवा माझ्या मतदारसंघांमध्ये या सर्व गोष्टी मी उत्तमरित्या चालवत असून माझ्या मतदारसंघात असणारा माळेगाव कारखाना असो किंवा सोमेश्वर कारखाना असो दोन्ही कारखाने बघणे गरजेचे आहे. एखादा कारखाना उभारल्यानंतर साधारणपणे सात वर्षांमध्ये तो पूर्णपणे कर्जमुक्त होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण आमच्या तालुक्यांमध्ये आहे या सोबतच सोमेश्वर कारखाना हा सुद्धा अडचणीत आलेला होता; परंतु त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी तेथील पदाधिकाऱ्यांना कारखाना माझ्याकडे मागितला. माझ्याकडे कारखाना आल्यानंतर संपूर्ण कारखाना हा अडचणीतून बाहेर काढून आत्ता शेतकऱ्यांना उत्तम रित्या दर देत असून श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जमीन विक्री करून सुद्धा अद्यापही कारखाना हा आव्हाडे कसे काय चालवत आहेत? हा मोठा प्रश्न मला पडला असल्याचे सुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार म्हणाले की; फलटण शहरासह तालुक्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर उभे असलेल्या सचिन सुधाकर पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करणे गरजेचे आहे. फलटण तालुक्याचा जो विकासाचा बॅकलॉग राहिलेला आहे तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी कटीबद्ध असून फलटण शहराला ग्रीन सिटी बनवणार आहे. यासोबतच क्रीडा संकुल, शैक्षणिक संकुल, सुसज्ज दवाखाना, कमिन्स या कंपनीतील युवकांना योग्य मानधन, अभ्यासिका, बस स्थानकावर चार्जिंग स्टेशन, भूमिगत वायरिंग, नाट्यगृह अशी कामं आपण मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी दिले.
शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, तीन मोफत गॅस सिलेंडर, दुधाला ७ रुपये अनुदान इत्यादी सर्व योजनांसाठी एकूण ७५ हजार कोटी रुपयांचा निधी आवश्यक होता. जेव्हा महायुती सरकारनं योजना जाहीर केल्या, तेव्हा योजनांसाठी लागणारा पैसा कुठून आणणार, असा प्रश्न महाविकास आघाडीनं उपस्थित केला होता. आता महाविकास आघाडीनं अनेक योजना जाहीर केल्या आहेत, त्यासाठी विरोधक पैसे कुठून आणणार?; असा सवाल सुद्धा यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी उपस्थित केला.
सचिन पाटील सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत. सध्या शेती करत आहेत. त्यांना प्रचंड बहुमतानं निवडून द्या, विकास खेचून आणू, हा शब्द देतो. केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. निधीची कमतरता पडणार नाही. मी सकाळी पाच वाजता उठून सहा वाजता कामाला सुरुवात करतो. पण मला कामांमध्ये गुणवत्ता लागते. अनेक ठेकेदारांना मी कामं दिली, पण भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मी काळ्या यादी टाकलेलं आहे; असे मत सुद्धा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी यावेळी व्यक्त केले.