आगामी महानगरपालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी हळूहळू सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विविध पक्षांचे नेते दौऱ्यावर असून, पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. महाविकास आघाडी एकत्रितपणे भाजपविरोधात लढण्याची तयारी करताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या नाशिक दौऱ्यावर आहेत. यातच काही शेतकरी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आली होते. शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे गाऱ्हाणी मांडली. यावेळी अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानावेळी काय होते, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही शेतकरी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. या शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर अडचणी, समस्या मांडल्या. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. मात्र, यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना थेट सवाल केला. तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होते? तुम्ही मला मतदान करत नाही, मग माझ्याकडे का येतात? ज्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू, असे आश्वासन दिले होते, त्यांनाच तुम्ही मतदान केले ना?, अशी विचारणा करत, जे तुमची पिळवणूक करता, त्यांनाच तुम्ही मतदान करता, याचे भान तुम्ही ठेवायला हवे, असे राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार
राज ठाकरेंनी केलेल्या प्रश्नांनंतर आम्ही सगळे शेतकरी आता तुमच्यामागे आहोत, असे आश्वासन शेतकऱ्यांकडून देण्यात आले. तर, येत्या तीन चार दिवसांत शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मुख्यमंत्री यांच्याशी भेट घेणार असल्याची ग्वाही राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिली. दुसरीकडे, निमा प्रदर्शनास राज ठाकरे यांनी भेट दिली. येथील विविध स्टॉलला भेट देत पाहणी केली. विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यानंतर त्यांच्यासोबत स्टेजवर खाली बसून फोटो काढल्याचे सांगितले जात आहे.