दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । सोलापूर । शाररीक व मानसिक आरोग्यासाठी निमित योग करावे, योगसाधनेच्या निरंतर अभ्यासामुळे शरीर, मन आणि आत्मा यांची सांगड घातली जाते. ते एकमेकांना जोडले जावून त्यांच्यातील समतोल राखण्यास मदत होते. असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले.
भारत सरकरच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूर, जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र, पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, विवेकानंद केंद्र, भारतीय योग संस्था, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, रुद्र अकादमाी ऑफ मार्शल आर्ट अॅंड योग यांच्या संयुक्त विदयामाने नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिंडीच्या उदघाटन प्रसंगी श्री चव्हाण बोलत होते.
यावेळी जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, योग समन्वयक मनमोहन भुतडा, पंतजली योग पीठाच्या केंद्रीय तथा महाराष्ट्र राज्य महिला प्रभारी सुधा अळळीमोरे, संगीता जाधव, दत्तात्रय चिवडशट्टी, रोहिणी उपळाईकर, जितेंद्र माहमुनी, रघुनंदन भुतडा आणि क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सेवासदन प्रशालेच्या मैदानावर दुपारी चारपासून लोकांनी रॅलीसाठी गर्दी केली होती. ‘करा योग रहा निरोग’ मानवतेच्या कल्याणासाठी योग, हर दिल में योग हर घर में योग, भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणासह आज नवी पेठ परिसर दुमदुमला होता. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाचशे लोकांची काढण्यात आलेली योग दिंडी सेवासदन प्रशाला येथून निघून सरस्वती चौक-हुतात्मा चौक-सुभाष चौक-दत्त चौक मार्गे जाऊन सरस्वती प्रशाला येथे विर्सजीत करण्यात आली. यावेळी सर्व योग संस्थाच्या प्रतिनिधी यांनी योगविषयक संदेश देणारे फलक, झेंडे आपल्या हातामध्ये घेतले होते.
बुधवारी दि. २१ जून २०२३ रोजी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याकरिता सकाळी ७ ते ८ यावेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर वसुधैव कुटुंबकमसाठी योग विषयावर योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अभ्यास सर्व वयोगटांसाठी खुले आहे. यामध्ये मोठया संख्येने लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरो आणि योग समन्वय समिती यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.