जिहे-कठापूर पाटबंधारे विभागाविरोधात उपमुख्यमंत्र्यांकडे धाव
स्थैर्य, कातरखटाव, दि. १८ : खटाव तालुक्यात सतत दोन दिवस पडलेल्या पावसामुळे येरळा नदीला महापूर आला. या महापुरामुळे भुरकवडी, कुरोली, वाकेश्वर, वडूज, गणेशवाडी, बनपुरी आदी गांव परीसरात लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. पुरामुळे गोरेगांव येथील पुल पाण्यात वाहून गेला आहे. तर भुरकवडी येथील पुलाचा भराव खचला आहे. कुरोली येथील रानमळा परीसरातील मोठ्या वित्त हानीस जिहे-कठापूर पाटबंधारे विभागाचा गहाळ कारभार कारणीभूत ठरला आहे. या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अशोकराव मोहिते व इतर शेतकर्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे धाव घेतली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, दोन दिवसांपूर्वी आलेल्या येरळा नदीच्या महापूरात रानमळा शिवारातील अशोकराव मोहिते यांची गट क्र. 656 मधील ऊस शेतीचे प्रचंड नुकसान होण्याबरोबर जमीनीतील माती पूर्णपणे वाहून गेली आहे. आजूबाजूच्या शेतकर्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. नुकसान होण्याची ही तिसरी वेळ आहे. यासंदर्भात गेली दहा वर्षे अनेकवेळा निवेदन देवूनसुध्दा जिहे-कटापूर पाटबंधारे विभागाचे अधिकारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याने आता शेतकर्यांनी थेट अजितदादांच्याकडे धाव घेतली आहे. कुरोली येथील अर्जुन नामदेव देशमुख, माधव निवृत्ती देशमुख यांच्या शेतातील ऊसाचे पिक पुर्णपणे झोपले आहे. पुराच्या पाण्यामुळे भुरकवडी येथील गावची जुनी पाणी पुरवठा विहीर वाहून गेली आहे. तर भुरकवडी-कुरोली रस्त्यावरील पुलाचा भराव खचला आहे. हा भराव खचल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चुन बांधलेल्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने तातडीने डागडुजी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम यांनी केली आहे. यावेळी शिवाजी कदम, मधुकर कदम उपस्थित होते.
वाकेश्वर येथील अशोक सावता राऊत यांच्या ऊस शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. तर गट नं. 669 नजीक असणारी चंद्रकांत जगन्नाथ फडतरे, लक्ष्मण जगन्नाथ फडतरे, भरत जगन्नाथ फडतरे या तीन बंधूंच्या सामुहिक मालकीची विहीर पुर्णपणे गाळाने बुजून जाण्याबरोबर एका बाजूने विहीरीची रिंग उचलली आहे. या नुकसानमुळे येरळा नदीकाठचा शेतकरी पुरता हवालदील झाला असून शासकीय यंत्रणेने तात्काळ पंचनामा करुन बाधितांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
गोरेगांव पुल वाहून गेला….
यावेळच्या येरळा पुराला प्रचंड वेग होता. या वेगाने पहिल्यांदा निमसोड-मोराळे रस्त्यावरील पुल वाहून गेला. तर दुसर्या दिवशी अंबवडे-गोरेगांव रस्त्यावरील पुल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल दुरुस्ती संदर्भात तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.