
दैनिक स्थैर्य । 28 मे 2025। सातारा । मागील आठदिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येरळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. तलाव परिसरात पर्जन्यवृष्टी होत असल्याने पाटबंधारे विभाग, प्रशासन तसेच नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
खटाव तालुक्याच्या बहुतांशी भागाला येरळवाडी तलावातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यामहिन्यात तलावामध्ये 60 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या आठवडाभरात तालुक्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने येरळा नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. शिवाय येरळवाडी तलावाला जाऊन मिळणार्या परिसरातील गावोगावचे ओढे, नालेही प्रवाहित झाल्यामुळे येरळवाडी तलावात अल्पावधीतच चांगल्या प्रमाणात पुरेसा पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे. आज सकाळी येरळवाडी तलाव पूर्णक्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. प्रथमच मे महिन्यातच येरळवाडी पूर्ण क्षमतेने भरले आहे. येरळवाडी तलाव अल्पावधीतच पूर्ण क्षमतेने भरल्याने अनेक गावांचा शेतीसह पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. येरळामाई गेल्या चार ते पाच दिवस सुरू असलेल्या पावसामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे तालुक्याला वरदान ठरणारा येरळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून वाढत्या पाणीपातळीमुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.
पूर्व भागातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या विसर्गामुळे बनपुरी गावापासून येरळेचे नदीपात्र लवकरच प्रवाहित होणार असल्याने नदी तीरावरच्या गावांतील भूजल । पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. सलग चार वर्ष हा तलाव पूर्ण क्षमतेने भरतअसून, दुष्काळी जनतेला मोठा आधार वाटत आहे. दुष्काळीभागावर वरूण राजाची कृपा दिसल्याने शेतकर्यांसह गावकरीहीसमाधानी असल्याचे दिसून येत आहे. सुमारे सव्वा टी.एम.सी.क्षमता असलेल्या तलाव्याचे पाणी सांडव्यावरून वाहत असल्याने परिसरात मच्छिमारीला उधाण आले आहे.
या तलावातील पाण्याच्या विसर्गामुळे तलावाखालील येरळा नदीचे पात्र प्रवाहित होण्यास मदत होणार आहे तर नदी तीरावरच्या अंबवडे, गोरेगाव, मोराळे, गुंडेवाडी व चितळी या गावातील भूजलसाठा वाढण्यास एकप्रकारे मदत होत आहे. येरळवाडी मध्य प्रकल्पाची साठवण क्षमता 32.80 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मुख्य धरण हे मातीचे असून त्याची लांबी 1825 मीटर आहे. 290 मीटरद्वार विरहित सांडवा आहे. एकूण धरणाची लांबी 2115 मीटर आहे. एकूण साठवण क्षमतेपैकी मृत पाणीसाठा 13.20 द.ल.घ.मी व उपयुक्त पाणीसाठा 19.60 द.ल.घ.मी.असा आहे. धरणाचे ठिकाण अवर्षणप्रवण क्षेत्रात समाविष्ट असल्यामुळे सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी मागणी कायम होत असते. सिंचन क्षमता 4037 हेक्टर क्षेत्र असून उजव्या कालव्यावरून 2460 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली तर डाव्या कालव्यावरून 1577 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते.
मागील तीन, चार दिवसात पुसेगाव, खटाव, खातगुण परिसरात जोरात पाऊस झाल्यामुळे तसेच नेर तलावही फूल भरल्यामुळे नदीला पूर आला आहे. वडूज के. टी. बंधार्यावरून पाणी वाहिल्याने येरळा नदी काठावर स्मशानभूमी व म्हसोबाचा मळा परिसर रस्तावर पाणी आले होते.