
दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी, संचलित मुधोजी महाविद्यालय हे स्वर्गीय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वशैलीमुळे जागतिक स्तरावर ‘वक्तृत्व पंढरी’ म्हणून विशिष्ट उंचीवर पोहोचले आहे, असे प्रतिपादन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
मुधोजी महाविद्यालय आयोजित श्रीमंत विजयसिंहराजे ऊर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा “श्रीमंत शिवाजीराजे करंडक २०२५” च्या उद्घाटन व शुभेच्छा कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रो. डॉ. पंढरीनाथ कदम अध्यक्षस्थानी होते. स्पर्धा संयोजन समितीचे चेअरमन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रमुख अतिथींचा व परिक्षकांचा परिचय करून दिला. आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. टी. पी. शिंदे, संयोजन समिती सदस्य प्रा. डॉ. अशोक शिंदे, डॉ. सविता नाईक निंबाळकर, प्रा. डॉ. निर्मला कवठेकर , प्रा. प्रशांत शेट्ये, प्रा. फिरोज शेख, प्रा. विशाल गायकवाड, प्रा. शैला क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका प्रो. डॉ. मनीषा पाटील, मातोश्री बायबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयातील प्रा. डॉ. मच्छिंद्र कुंभार व प्रा. शैला क्षीरसागर यांनी काम पाहिले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी उद्घाटन सत्राचे आभारप्रदर्शन केले. प्रा. डॉ. अभिजीत धुलगुडे, प्रा. फिरोज शेख व प्रा. प्रशांत शेट्ये यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोपप्रसंगी राजाराम बबनसाहेब नाईक निंबाळकर, फ. ए. सोसायटी बोर्ड ऑफ ट्रस्टीजचे सदस्य यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली, तर प्रा. डॉ. टी. पी. शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत सात विद्यापीठातील स्पर्धक सहभागी झाले .
या स्पर्धेत यश पाटील, महात्मा फुले कॉलेज, रायगड हा प्रथम क्रमांक पटकावून ‘श्रीमंत शिवाजीराजे करंडक २०२५’चा महाविजेता बनला. रोख रक्कम रु. ५००० व करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यास गौरवण्यात आले. अभय आळशी, व्ही. जी. वझे कॉलेज, मुंबई यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. रोख रक्कम रु. ३००० व चषक तर वनारे अनिकेत रामा, संताजी कॉलेज, नागपूर यांनी तृतीय क्रमांकाचे यश मिळवले. रोख रक्कम रु. २००० व चषक तर बोडखे आकाश, श्री ओंकारनाथ मालपाणी लॉ कॉलेज , संगमनेर यांनी ‘ब’ गटातील विशेष पारितोषिक रु. ३००० व चषक पटकावला.
या स्पर्धेसाठी विराज लालासाहेब नाईक निंबाळकर यांनी चषक सौजन्य केले. प्रा. विशाल गायकवाड यांनी समारोप समारंभाप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व प्रशासकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता.