स्थैर्य, फलटण, दि. ०५ : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील अभियंते व मुंबईच्या जे. एम. म्हात्रे इंन्फ्रा प्रा. लि. कंपनीचे जनरल मॅनेजर दीपकसिंह पाटणकर यांची कन्या यामिनी पाटणकर हीने कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वैधानिक मंडळ, भारत सरकार आयोजित शोधनिबंध स्पर्धेत पश्चिम भारत विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
यामिनी पाटणकर हीने मुंबईच्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर या महाविद्यालयातून आर्किटेक्चर क्षेत्रातील पदवी प्राप्त केली असून तीने कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर वैधानिक मंडळ, भारत सरकार आयोजित राष्ट्रीय शोधनिबंध स्पर्धेत भाग घेतला होता. देशभरातील पाच विभागातून ५६० शोधनिबंध सादर करण्यात आले होते. त्यामधून प्रत्येक विभागातून दोन याप्रमाणे दहा उत्कृष्ट शोधनिबंधांची निवड करण्यात आली होती.
यामिनी पाटणकर हीने महाराष्ट्र – गुजरात या पश्चिम विभागातून “छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगड एक इतिहासकालीन ठेवा” या संदर्भात “किल्ले प्रतापगडाचे संरक्षणआणि तेथे रहात असलेल्या व विविध कलाकौशल्य जपणाऱ्या लोकांचे संवर्धन” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता.
या शोधनिबंधासाठी त्यांना प्रा. रितू देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. यामिनी पाटणकर ही सध्या मध्यप्रदेश राज्यातील स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲन्ड आर्किटेक्चर शासकीय महाविद्यालय, भोपाळ येथे मास्टर इन आर्किटेक्चर कॉंझरवेशन या विषयातील पदवीत्तर ऑनलाईन शिक्षण घेत आहे. तीच्या या यशाबद्दल सर्वत्र तीचे कौतुक होत आहे.