दैनिक स्थैर्य | दि. २० ऑक्टोबर २०२१ | सातारा | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात 1997 साली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या आराखडय़ात ऐनवेळेस समावेश केलेल्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी तब्बल 26 वर्षांनी नेर तलावात आले. यामुळे कायम दुष्काळी असा टिळा माथी असलेल्या खटाव तालुक्यातील शेतकरी वर्गाची छाती 56 इंचाने फुगली असून, सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
खटाव तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या जिहे-कटापुर योजनेचे पाणी सोमवारी सायंकाळी नेर तलावात पोहचले. या पाण्याचे पूजन आज सकाळी आमदार महेश शिंदे यांनी सपत्नीक केले.
1995 साली मंजूर झालेल्या या योजनेचा फायदा खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला मोठया प्रमाणात होणार असल्याने या भागातील शेतकरी या योजनेकडे डोळे लावून बसले होते. नेर तलाव भरल्यानंतर येरळा नदी बारमाही वाहणार असल्याने अगोदरच शासनाने या नदीवर सुमारे 16 बंधारे बांधले आहेत. अखेर 26 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नेर तलावात पाणी आल्याने शेतकरी वर्गात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिहे कटापूर ऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू “स्व लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना” असे या योजनेचे नामकरण काही महिन्यांपूर्वी झालेले आहे.