
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या आवाहनानुसार जैन सोशल ग्रुप फलटणच्या वतीने ९ एप्रिल रोजी जागतिक नवकार महामंत्र पठण दिनानिमित्त विश्व शांतीसाठी नवकार महामंत्र सामूहिक पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 8 एप्रिल : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) च्या विशेष आवाहनानुसार आणि जैन सोशल ग्रुप, फलटण यांच्या पुढाकाराने उद्या, गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी फलटणमध्ये विश्व शांतीसाठी ‘नवकार महामंत्राचे पठण’ या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर यांच्या सहकार्याने पार पडणार आहे.
कार्यक्रमाची वेळ आणि स्थळ:
मारवाड पेठ, फलटण येथील ‘श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर’ येथे गुरुवारी सकाळी ८.०५ ते ९.३० या वेळेत या सामूहिक नवकार महामंत्र पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक नवकार महामंत्र पठण दिन:
जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री. श्रीपाल जैन यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की, ‘९ एप्रिल’ हा दिवस संपूर्ण जगात ‘जागतिक नवकार महामंत्र पठण दिन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. याच ऐतिहासिक आणि पवित्र दिवसाचे औचित्य साधून फलटणमध्येही या जागतिक उपक्रमात सहभाग नोंदवला जाणार आहे. जैन सोशल ग्रुप मार्फत आयोजित या कार्यक्रमातून विश्व शांती, अहिंसा आणि जागतिक कल्याणाचा संदेश दिला जाणार आहे.
तरी या पवित्र आणि मंगलमय नवकार महामंत्र पठण कार्यक्रमास सकल जैन बांधवांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जैन सोशल ग्रुप फलटण आणि श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

