धुमाळवाडी येथे ‘रानभाजी ओळख व संवर्धन’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

विविध शासकीय व शैक्षणिक संस्थांचा संयुक्त उपक्रम; रानभाज्यांच्या आहारातील महत्त्वावर भर


स्थैर्य, धुमाळवाडी, दि. २३ सप्टेंबर : ‘फळांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुमाळवाडी (ता. फलटण) येथे रानभाज्यांचे आहारातील महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘रानभाजी ओळख व संवर्धन’ या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मॉडर्न महाविद्यालय पुणे, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ, तालुका कृषी विभाग फलटण आणि धुमाळवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी रानभाजीवर आधारित चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांनी २० हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले आणि त्यांच्या पाककृतींची प्रात्यक्षिके सादर केली.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे अधोरेखित केले. मॉडर्न महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्राची क्षीरसागर यांनी रानभाज्यांच्या संवर्धनाची गरज आणि त्यांच्या लागवडीचे शास्त्रशुद्ध तंत्र यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय सल्लागार विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, जिल्हा प्रकल्प सल्लागार अभिजित काटकर, मंडळ कृषी अधिकारी शहाजी शिंदे, ग्रामसेविका मोनिका सावंत, मुख्याध्यापिका स्मिता अडसूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. कृषी सहाय्यक सचिन जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. “रानभाजी खाऊ… निरोगी राहू” या घोषवाक्याने कार्यशाळेची सांगता झाली.


Back to top button
Don`t copy text!