दैनिक स्थैर्य | दि. ५ मार्च २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील सोनगाव (बंगला) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमांतर्गत ‘जीवामृत कसे बनवावे व त्याचे फायदे’, या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
जीवामृतामुळे पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. शेतात बॅक्टेरियांची उपज वाढवायला याचा उपयोग होतो. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. पिकाची वाढ जोमदार होते. जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते. किड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती उत्पन्न होते. शेतामध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो. रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते, असे अनेक फायदे कृषिकन्यांनी तक्त्यांच्या मदतीने स्पष्ट केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रितल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकंन्यानी हा कार्यक्रम पार पाडला.