
स्थैर्य, फलटण, दि. 31 ऑगस्ट : ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात पंचायत राज संस्थांचे योगदान वाढवण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत, फलटण पंचायत समितीच्या सभागृहात एकदिवसीय तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचा उद्देश पंचायती राज संस्थांना अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करणे हा आहे.
या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना निमंत्रित करण्यात आले होते. अभियानांतर्गत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, उपजीविका आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे.
हे अभियान दि. १ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवले जाणार असून, याची सुरुवात दि. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेतून होणार आहे. या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून लोकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.