
स्थैर्य, सातारा, दि. ८: लोणंद औद्योगिक वसाहतीतील भारत गिअर्स कंपनी व्यवस्थापनाने राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या सभासदांवर अन्यायाची मालिका सुरुच ठेवली आहे. कंपनी व्यवस्थापनाला त्यांची जागा दाखवून देण्याबरोबरच न्याय हक्कांसाठी मंगळवार दि. ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा युनियनने दिला आहे. दरम्यान, आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या युनियनमुळे लोणंद-खंडाळा-शिरवळ औद्योगिक पट्ट्यात कामगारांना आधार मिळालेलाच असताना, भारत गिअर्सचे व्यवस्थापन मात्र चुकीच्यापध्दतीने मार्गक्रमण करत आहे. त्यांना त्यांची जागा आता दाखवून दिली जाणार आहे.
भारत गिअर्स कंपनी व्यवस्थापनाने भूमिपूत्र असलेल्या कामगारांवर अन्यायाची मालिकाच सुरु ठेवली होती. मूलभूत अधिकारांपासून कामगारांचा वंचित ठेवण्याबरोबरच कामावरुन कमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. कामगारांनी आपल्या व्यथा आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी आपल्या युनियनची स्थापना या कंपनीमध्ये केली होती. दोनवेळेस कंपनीला भेट देऊन कामगारांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र कंपनी व्यवस्थापनाने कामगारांवर अन्यायाची मालिका सुरुच ठेवली होती. युनियनमुळे कामगारांना न्याय व हक्क द्यावा लागणार, या भीतीने व्यवस्थापनाने युनियन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरुक कामगारांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
व्यवस्थापनाने कामगारांना युनियन सोडण्याचे अमिष दाखविले, जे अमिषाला भुलले, त्यांना कामावर घेण्यात आले. उर्वरित कामगारांनी मात्र युनियनच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार केला आहे. व्यवस्थापनाच्या आडमुठे भूमिकेच्या निषेधार्थ मंगळवार दि. ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सातारा येथे आज व्यापक बैठक
दरम्यान, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर शासनाचा कामगार विभाग सतर्क झाला असून, त्यांनी तातडीने हालचाल करत सोमवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता सातारा येथील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात विशेष बैठक आयोजित केली आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					