स्थैर्य, दि.१०: भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बुधवारी कर्मचाऱ्यांनी बंद पाडला. तब्बल दीड वर्षांपासून कामगारांना पगारच मिळालेला नसल्याने कामगार संपावर गेले आहेत. जोपर्यंत पगार मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे.
मागच्या काही वर्षांपासून पडणारा दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. आता कर्मचाऱ्यांचे दीड वर्षांपासूनचे वेतन थकलेले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले होते. दहा दिवस उलटूनही पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळपासूनच कारखाना बंद केला असून त्यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.
कामगारांनी बुधवारी सकाळी हा कारखाना बंद करून संप पुकारला. यावेळी काही अधिकाऱ्यांनी कामगारांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी भेट देत पाहणी केली.