
सुरवडी (ता. फलटण) येथील कमिन्स इंडिया कंपनीच्या गेटसमोर पार्क केलेली एका कामगाराची ४५ हजार रुपये किमतीची ‘हिरो स्प्लेंडर’ दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तब्बल दहा महिन्यांनंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ७ मार्च : सुरवडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत असलेल्या कमिन्स इंडिया (Cummins India) कंपनीच्या गेटसमोरून एका कामगाराची ४५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या या घटनेनंतर संबंधित तरुण कंपनीच्या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने, तब्बल दहा महिन्यांनंतर याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.
याप्रकरणी आकाश मधुकर रणवरे (वय २९ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. जिंती, ता. फलटण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश रणवरे हे २०१७ पासून सुरवडी येथील कमिन्स इंडिया कंपनीमध्ये हेल्पर म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामाला आहेत. त्यांच्याकडे कामावर येण्या-जाण्यासाठी ४५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-11 CF 3713) आहे.
दिनांक ३ मे २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता आकाश हे त्यांच्या मित्रांसोबत (अरुण जाधव आणि संग्राम रणवरे) पहिल्या शिफ्टसाठी कंपनीत आले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली दुचाकी कंपनीच्या गेटसमोर सुरवडी-नांदल रोडवर पार्क केली आणि ते आत कामाला गेले.
शिफ्ट सुटून आल्यावर दुचाकी गायब
दुपारी २.०० वाजता पहिली शिफ्ट संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी दुचाकी लावलेल्या ठिकाणी आले, मात्र त्यांना त्यांची मोटारसायकल तिथे मिळून आली नाही. त्यांनी आपले मित्र अरुण आणि संग्राम यांच्या मदतीने कंपनीचा गेट परिसर, सुरवडी गाव, नांदल रोड आणि आजूबाजूच्या परिसरात दुचाकीचा कसून शोध घेतला, परंतु ती कुठेही सापडली नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने ती लबाडीने चोरून नेल्याची त्यांची खात्री झाली.
दुचाकी चोरीला गेल्यानंतर त्यांना पोलिसांत तक्रार द्यायची होती, मात्र कंपनीच्या कामानिमित्त ते बाहेरगावी गेल्याने त्यांना तक्रार देण्यास उशीर झाला. अखेर गावी परतल्यानंतर त्यांनी ५ मार्च २०२६ रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध आपली दुचाकी चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे. या चोरीचा पुढील तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.

