दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी महासंघाचे अध्यक्ष डुबल आप्पा यांना उपजिल्हाधिकारी तथा जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणेचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी अर्वाच्च भाषेत बोलून अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने पुकारलेल्या काम बंद आंदोलनात फलटण तालुका तलाठी संघाने सहभागी होवून तहसील कार्यालयात निदर्शनाद्वारे निषेध नोंदवला.
फलटण तालुका तलाठी संघाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले आहे की, राज्य तलाठी संघटनेच्या निर्देशाप्रमाणे पुढील आदेश होईपर्यंत नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामकाज वगळून इतर सर्व कामांवर बहिष्कार घालण्यात आलेला आहे. फलटण तालुक्यातील सर्व खातेदार, शेतकरी, नागरिकांनी आंदोलनास पाठींबा देवून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.