स्थैर्य, फलटण, दि. ७ : फलटण शहरामध्ये सध्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे फलटण शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. तरी नागरिकांची हेळसांड न होता भुयारी गटार योजनेचे काम करण्याबाबतच्या सूचना महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी समंधिताना दिल्या आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील बुरुड गल्ली, रिंग रोड परिसर, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, डी. एड. कॉलेज चौक, विद्यानगर परिसर येथील भुयारी गटार योजनेच्या सद्यस्थितीत या कामाची पाहणी केली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, असिफ (बाळासाहेब) मेटकरी, श्रीमंत रामराजे युवा मंच संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर, युवा नेते तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक किशोर (गुड्डू) पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण शहरामध्ये भुयारी गटार योजना ही महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणलेली आहे. भुयारी गटार योजना ही पूर्णपणे होण्यासाठी रस्ते खोदण्याशिवाय पर्याय नाही. त्यामध्ये काही अडचणी आलेल्या होत्या. त्या दूर करून भुयारी गटार योजनेचे प्रत्यक्षात काम सद्यस्थितीला फलटण शहरामध्ये सुरू आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी जो रस्त्यामध्ये चर काढण्यात आलेला होता. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे फलटणकरांच्या तक्रारी पोहोचल्या. त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः फलटण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी केली व संबंधितांना योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, भुयारी गटार योजनेचे ज्या रस्त्यावर काम चालू आहे ते रस्ते पूर्ण झाल्यानंतर फलटण शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या साठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भरीव निधी मंजूर करून आणलेला आहे. सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. फलटण शहरातील सर्वच रस्ते लवकरात लवकर कसे व्हावे त्यासाठी एका मोठ्या कंत्राटदाराच्या कडून सदरील काम लवकरात लवकर करून घेतले जाणार आहे.
सद्यस्थितीमध्ये फलटणमधील नागरिकांना निश्चितच गैरसोय होत आहे. परंतु भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत फलटणकरांना थोडीशी गैरसोय सहन करावी लागणार आहे. भुयारी गटार योजना ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्नातून फलटणसाठी आणलेली आहे व फलटण साठी भुयारी गटार योजना ही अत्यंत महत्त्वाची असून भुयारी गटार योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.