दैनिक स्थैर्य | दि. ८ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
वाड्या-वस्त्या, दुर्गम व ग्रामीण भागातील त्याचप्रमाणे शहरी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून साकारलेली आर्थिक प्रगती व व्यवसायाचे जाळे ज्ञानात भर टाकत असताना अंगणवाडी सेविका व बचत गट समूहातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रतिपादन केले.
पुणे जिल्हा परिषदच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला बालकल्याण विभाग व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामती तालुका अंगणवाडी सेविका व महिला स्वयंसहाय्यता गट कौशल्य विकास व क्षमता बांधणीसाठी एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालिका शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, तहसीलदार गणेश शिंदे, बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, महाराष्ट्र उद्योजकताचे प्रकल्प समन्वयक नितीन बेंद्रे, उपजिल्हाधिकारी तथा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक हनुमंत पाटील, टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ व विविध बँकाचे प्रतिनिधी, महिला बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याने कुटूंब समृद्ध झाले. मुलाचे शिक्षण, करिअरमध्ये कुटूंबप्रमुख पुरूषांप्रमाणे महिला हातभार लावू शकतात, हे सिद्ध झाल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
बचतगटाच्या माध्यमातून केवळ महिलांची नाही तर कुटुंबाची व देशाची प्रगती होत आहे. शासनाच्या विविध योजनांचा माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचे पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले.
विविध बँकांच्या माध्यमातून व शासनाच्या योजनेतून महिलांना आर्थिक सहकार्य करत असताना महिला यशस्वी उद्योजिका होत आहेत, ही समाधानाची बाब आहे. अंगणवाडी सेविकेचे सुद्धा उत्कृष्ट कार्य असून महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्याचा आढावा बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी प्रास्ताविकात घेतला.
प्रकल्प संचालिका शालिनी कडू व टेक्सटाईल पार्कच्या सहायक व्यवस्थापिका वृषाली सावंत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
तालुक्यातील विविध बचतगटांना समुदाय गुंतवणूक, उद्योग व्यवसायासाठी धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. करंजेपूल निबुत येथील महिला बचतगटांनी ‘नवी उमेद’ हे पथनाट्य व अभिनेते रामभाऊ जगताप यांनी प्रबोधनात्मक नाटिका सादर केली.
सूत्रसंचालन श्री. सावळे-पाटील यांनी केले व आभार नंदन जरांडे यांनी मानले.
अंगणवाडी सेविका व महिला बचत गटाच्या महिला यांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती. रामभाऊ जगताप यांच्या गाण्यावर ठेका धरून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.