‘आईंसाठी खास दिवस’! श्रीराम विद्याभवनमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात


फलटणच्या श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेत महिला पालकांसाठी वेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा. विविध स्पर्धा, पैठणीचा सन्मान.

स्थैर्य, फलटण, दि. ८ मार्च : फलटण येथील महात्मा एज्युकेशन सोसायटी, फलटण संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, फलटण येथे जागतिक महिला दिन अत्यंत उपक्रमशील आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधून चिठ्ठीद्वारे भारती उदय पुजारी या पैठणीच्या मानकरी ठरल्या. त्यांच्या या सन्मानामुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

महिला पालकांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, प्रश्नमंजुषा, चेंडू नेमबाजी, उखाणे तसेच ‘हनुमान-नरसिंह ॲक्शन’ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, इंटेरियर डिझायनर चंदाताई जाधव, भूलतज्ञ डॉ. सुनिता निंबाळकर आणि एसबीआयच्या रूपाली काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी श्रीराम विद्याभवनचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भिवा जगताप तसेच बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सोनवले उपस्थित होत्या.

स्पर्धेतील विजेत्या

  1. प्रश्नमंजुषा – अंजली सागर शिंदे
  2. तळ्यात मळ्यात – पूजा निलेश पालकर
  3. संगीत खुर्ची – प्रमिला धायगुडे
  4. ॲक्शन स्पर्धा – अर्चना अहिवळे
  5. चेंडू नेमबाजी – अनिता अर्जुन पवार
  6. उखाणा स्पर्धा – भारती उदय पुजारी

या विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी महिला पालकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेतले. या संवादातून महिलांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे ‘लांबलचक उखाणा’ ही स्पर्धा सर्वाधिक आकर्षण ठरली. या स्पर्धेतून मराठी संस्कृतीचे सौंदर्य अनुभवायला मिळाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली निंबाळकर, विजया भोसले, हेमलता गुंजवटे, निलिमा मगदूम, शमीम शेख, निकिता कुलकर्णी, संतोषी हजारे, ज्योती शिंदे, पूजा जाधव आणि मीना मदने यांनी विशेष परिश्रम घेतले. दिपाली निंबाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


Back to top button
Don`t copy text!