दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा मार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वनभवन कार्यालय गोडोली येथे महिला जनजागृती कार्यक्रम विभागीय सहनियंत्रक व मुल्यमापन अधिकारी (माविम) विलास बच्चे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, डॉ. पल्लवी साठे, स्थानिक तक्रार निवारण समितीच्या सदस्या ॲड. सुचिता कोकीळ, जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी श्री. बच्चे यांनी महिलांच्या सामाजिक स्थितीबाबत व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबाबत उपस्थित महिलांना माहिती दिली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी समाजात व आजूबाजूला महिलांवर अन्याय, अत्याचार होत असल्यास महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा आधार घेऊन महिलांना तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन केले.
तसेच डॉ. पल्लवी साठे यांनी महलिांच्या आहार व आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक तक्रार निवारण समितीच्या सदस्या ॲड. सुचिता कोकीळ यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण 2013 या कायद्याबाबत मार्गदर्शन करुन, महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातारणात काम करता यावे यासाठी प्रत्येक कार्यालये व खाजगी आस्थापना, कंपन्या इ. ठिकाणी या कायाद्यांतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, संरक्षण अधिकारी (क) पवनकुमार अहिरे, समुपदेशक आरती रजपूत, श्रीमती विनया खुंटे उपस्थित होते.