दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । फलटण । ‘‘फलटण शहरासह तालुक्यातील महिलांसाठी ‘एक हात मदतीचा’ हि सहकार्याची भावना मनामध्ये ठेवूनच स्वयंसिद्धा महिला उद्योग समूह कायम कार्यरत असतो. गत दोन वर्षात कोरोना काळामध्ये महिलांसाठी कोणताही उपक्रम राबिविता आला नाही. नुकतीच सौ. मधुरा पाटील यांनी ‘नारी बाय मधुरा’ ची संकल्पना आम्हा सर्वांच्या समोर मांडली. मूळ फलटणच्या असलेल्या सौ. मधुरा पाटील या महिला उद्योजिका काहीतरी वेगळं करू पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी स्वयंसिध्दा महिला उद्योग समूह व भोसले कुटुंबीय यांनी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या ‘नारी बाय मधुरा’ या अनोख्या प्रदर्शनाचा फलटणमधील महिलांनी लाभ घ्यावा’’, असे आवाहन स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा तथा नगरसेविका अॅड.सौ. मधुबाला भोसले यांनी केले.
येथील हॉटेल महाराजा व्हेजच्या हॉलमध्ये स्वयंसिध्दा महिला उद्योग समूह व सौ. मधुरा पाटील यांच्या संयुक्त विद्यमातून ‘नारी बाय मधुरा’ हे महिला उपयोगी वस्तूंचे विशेष प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी अॅड.सौ. मधुबाला भोसले बोलत होत्या. यावेळी स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या संचालिका सौ.प्रियदर्शनी भोसले, ‘नारी बाय मधुरा’ च्या सर्वेसर्वा सौ. मधुरा पाटील, सोनिया चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. सुपर्णा अहिवळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
‘‘या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला उपयोगी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने हे प्रदर्शन फलटणकरांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. आगामी काळामध्ये प्रतिवर्षी असे प्रदर्शन आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न राहील’’, असेही अॅड.सौ.भोसले यांनी यावेळी स्पष्ट केले.
‘‘या प्रदर्शनामध्ये मुंबई येथील दुर्गा क्रिएशनच्या स्टॉलवर विविध पैठणी उपलब्ध आहेत. त्यासोबतच सौ. मधुरा पाटील यांच्या स्टॉल वर चंदेरी, माहेश्वरी आदी साड्यांच्या विविध व्हरायटीज उपलब्ध आहेत. सध्याच्या लग्न सराईमध्ये नाविन्यपूर्ण दागिने जर खरेदी करायचे असतील तर त्यासाठीच टाटा उद्योग समूहाचे असेलेले तनिष्क ज्वेलर्स यांचा सुद्धा स्टॉल या ठिकाणी आहे. यासोबतच सौ. सुपर्णा अहिवळे यांच्या काव्या क्रिएशनचा स्टॉल देखील येथे आहे. तरी फलटण मधील महिलांनी सदरील प्रदर्शनाचा लाभ घ्यावा’’, असे आवाहन सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी यावेळी केले.
‘‘हे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी अॅड.सौ.मधुबाला भोसले यांचे लाभलेले सहकार्य प्रेरणादायी आहे. स्वयंसिद्धाची साथ लाभल्याने आमच्या प्रदर्शनाला वेगळा दर्जा प्राप्त झाला असल्याचे सांगून या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ परिसरातील महिलांनी आवर्जून घ्यावा’’, असे आवाहन सौ.मधुरा पाटील यांनी यावेळी केले.
सदरचे प्रदर्शन दि. 22 व दि. 23 नोव्हेंबर रोजी फलटणकरांसाठी दिवसभर खुले राहणार आहे.