पशूसंवर्धन क्षेत्रात महिलांचा महत्त्वाचा वाटा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रांमध्ये महिलांचे असलेले योगदानावर चिंतन चर्चा होत असते. शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, खेळ, कला, व्यवस्थापन, व्यापार अशा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या महिलांचा सन्मान केल्या जातो. तथापि भारतासारख्या पारंपरिक कृषिप्रधान देशात, पशूपालन या क्षेत्रातही महिलांचे भरीव योगदान आहे हे नाकारता येत नाही. कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याची जिद्द, नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची आवड, सुलभ संवाद कौशल्य,  उपजत संघटन शक्ती व काळाच्या ओघात येणारे आत्मभान अशा अनेक गुणांनी पशुपालन क्षेत्रातील महिलावर्ग स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून पुढे सरसावताना दिसत आहे. मात्र भारतीय परंपरेतील रुजलेली लिंगभेद आधारित मानसिकता, कामाची असमान विभागणी आणि वेतनातील फरक, व्यावसायिक मर्यादा अशा अनेक बाबींमुळे आजही महिलांना सरस कामगिरी करताना अडचणी जाणवतात. पशुपालन क्षेत्रात पशुधनाचे संवर्धन करण्यात महिलांचा मोठा वाटा राहिला आहे, म्हणून त्यांची भूमिका समजून घेणे गरजेचे ठरते.

जगभरात महिलांचे कृषीक्षेत्रातील योगदान पाहील्यास, विकसनशील देशात सरासरी 40 टक्के वाटा आहे तर भारतात हे प्रमाण 30 टक्के एवढे आहे. भारतात सुमारे 75 दसलक्ष महिला केवळ दुग्धव्यवसायात गुंतलेल्या आहेत. यावरून पशुपालन क्षेत्रात महिलांना असलेल्या रोजगाराच्या  विपुल संधीची कल्पना येईल. आजही कृषी क्षेत्रात विविध लघू व मध्यम क्षेत्रात कार्यरत कुशल-अकुशल मजूर म्हणून काम करणाऱ्या सुमारे 70 टक्के महिला आहेत. कृषी घटकातून प्राप्त झालेल्या खाद्यपदार्थांच्या निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगात सुमारे 80 टक्के महिलाच आहेत. एवढेच नव्हे तर ग्रामीण बाजारपेठेत मालाची खरेदी-विक्री प्रक्रियेतही महिला कामगारांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण भारताचा विचार केल्यास विविध क्षेत्रांमध्ये तसेच विशेषता कृषी क्षेत्रामध्ये महिलाराज आहे असे म्हणता येईल. परंतु स्त्री पुरुष समानता या दृष्टी स्त्रियांची सद्यस्थिती पाहिल्‍यास कृषिपूरक क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मिळणारा कामाचा मोबदला अल्प असल्याचे दिसून येते ग्रामीण भागात तर ही असमानता अगदी कामाच्या वाटपावरुन सुद्धा दिसून येते. पशुपालन क्षेत्रातही जनावरांचे व्यवस्थापन, गोठ्याची साफसफाई, चारा-पाण्याची व्यवस्था, पशुधनाची खरेदी-विक्री तसेच पशुजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री अशा विविध क्षेत्रात महिलांचे व्यापक योगदान आहे तरीदेखील अनेक घटकांमुळे महिला आजही दुर्लक्षित आहेत. आजही महिला पशुपालक उत्पादक किंवा महिला पशुधन व्यापारी एकसंध आढळून येत नाहीत याचा अप्रत्यक्ष परिणाम व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर तसेच सामाजिक, आर्थिक आणि नैतिक विकासावर होत असतो.

पशुपालन क्षेत्राची महिलांच्या दृष्टीने उपयुक्तता

कृषिपूरक घटकांमध्ये पशूपालन हे एकमेव असे क्षेत्र आहे की ज्या मध्ये महिलांचा प्रवेश इतर घटकांपेक्षा अधिक सुलभतेने होताना दिसतो. अगदी लहान असल्यापासून पशुधनाशी महिलांचा संबंध येत असतो. दैनंदिन गोठ्यातल्या जनावरांना चारा पाणी करणे,  त्यांचे उपचार करणे, औषध उपचारासाठी दवाखान्यात नेणे याचबरोबर दूध किंवा अंडी अशा पशुउत्पादनांची जवळच्या स्थानिक बाजारपेठेत विक्री करणे या गोष्टी घरातील लहान-सहान मुलीपासून ते मोठ्या महिलांपर्यंत बिनदिक्कत पार पाडल्या जात असतात. त्यामुळे पशुधन व्यवस्थापन हे महिलांसाठी नवीन क्षेत्र नाही. भारताच्या कित्येक भागात लग्नामध्ये नववधूला गाई, शेळ्या, मेंढ्या असे पशुधन भेट देण्याची पद्धत प्रचलित होती. कदाचित काही भागात अथवा समुदायात आजही ही प्रथा दिसून येते. आजही भारतीय कुटुंबव्यवस्थेत अन्नसुरक्षा आणि अर्थसुरक्षा ही निर्विवादपणे महिलांनी व्यापलेली क्षेत्रे आहेत. आजही कुटुंबातील सर्व घटकांच्या आहाराचा, आरोग्याचा बारकाईने अभ्यास महिलांचा असतो. बचतीचे संस्कार महिलांना उपजतच असल्याने आजही विविध बचत गटांच्या नेतृत्वात महिला अग्रभागी आहेत उत्तम संवाद कौशल्य आणि नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची हौस महिलांना स्थानिक पातळीवरील बचत गटांना उभारण्यात साहाय्यभूत ठरतात. भटक्या अवस्थेत मानवास स्थिर जीवनशैली पशुपालनाच्या माध्यमातूनच झालेली आहे ही निर्विवाद गोष्ट असून शिकारीसाठी बाहेर पडणाऱ्या माणसांच्या तुलनेत मागे राहणाऱ्या स्त्रियांनी शेती आणि पशुपालन यास अंगीकारून मानवी वसाहतीस चालना दिलेली आहे.

महिला या उत्तम व्यवस्थापक तर असतातच त्याशिवाय त्यांचे संवादाची जाळे सामाजिक संपर्क म्हणजे सोशल नेटवर्किंग उत्तम असते. आपल्या जबाबदाऱ्या चटकन ओळखून नियोजित काम प्रामाणिकतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न महिला आवडीने करतात. महिला बचतगटाकडे पाहिल्यास त्यांच्यामध्ये उपजत असलेल्या संघटन कौशल्यचीही आपल्याला जाणीव होईल. आजही शहरी असो की ग्रामीण विविध क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी तोडत महिलावर्ग पुढे येताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं या महिला-भगिनी आपापले कुटुंब समर्थपणे सांभाळत करताना दिसतात आणि म्हणूनच महिलांनी विशेषतः ग्रामीण महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी सहज सुलभ असलेलं पशूपालन या क्षेत्राची निवड केल्यास त्यांचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकतो.

पशुसंवर्धनात महिलांचे योगदान

आज भारत देश दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील सुमारे १६ टक्के दूध निर्मिती हे आपल्या देशात होते. दरवर्षी दूध उत्पादन आलेख वाढताच आहे, थोड्याबहुत फरकाने असेच चित्र अंडी व मास उत्पादनाचे आहे. याचे निर्विवाद श्रेय पशूपालन करणाऱ्या कामगारांपैकी 60 ते 70 टक्के असलेल्या महिलांचे आहे. गुजरातमधील अमूल या दूध महापूर योजनेतून वर आलेल्या ब्रँडची पार्श्वभूमी आपण पाहिल्यास ग्रामीण भागातील दूध उत्पादक पशुपालकांची जाळे आणि महिलांचा सक्रिय सहभाग हे प्रमुख कारण आहे. भारताच्या विविध भागात असलेले अस्सल देशी पशूधन हेसुद्धा महिला वर्गाने जोपासले असल्याचे आपल्याला आढळते. आपल्या कुटुंबाचे आणि पशुधनाचे आहारशास्त्र योग्यपणे ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. आपल्या गोठ्यात असणारे पशुधन कसे असावे हे महिला ठरवतात. जनावरांच्या खाण्यापिण्यातील सूक्ष्म बदल महिला सहजपणे ओळखतात. पारंपारिक औषधउपचार पद्धती हा सुद्धा ज्ञानवारसा महिलावर्गानेच पुढे चालवलेला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. पशूंचे चारा व्यवस्थापन, आरोग्य उपचार, पैदास व्यवस्थापन तसेच पशु उत्पादनांचे मार्केटिंग/विपणन व्यवस्थापन अशा अनेक बाबींमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे आपण पाहतो. म्हणून एकूणच पशुसंवर्धन क्षेत्रात महिलांचे लक्षणीय योगदान आहे. शिक्षणक्षेत्रातही संशोधन आणि विस्तार कार्य अशा क्षेत्रात महिलावर्ग पुढे असल्याचे दिसून येते. पशुपालन क्षेत्रात रोजगाराच्या विपुल संधी उपलब्ध आहेतच याशिवाय सोबत कार्यरत असलेल्या महिलांमध्ये आत्मविश्वास, सशक्तिकरण आणि समानतेची बीजे रोवलेली आहेत. गरज आहे ही फक्त पशुपालक भगिनींनी संघटित होऊन काम करण्याची आणि समाजाने देखील आपली मानसिकता बदलण्याची.

महिलांना पशुसंवर्धनात येणाऱ्या अडचणी व उपाय

ग्रामीण भागात महिलांना काही अडचणी जरूर येतात. अगदी जनावरांच्या खरेदीपासून ते व्यवस्थापन आणि विक्री करेपर्यंत किंवा पशु उत्पादने बनवून प्रक्रिया करून त्यांची विक्री करेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. भारताच्या अनेक भागात विशेषता ग्रामीण भागात महिलांच्या कामास दिला जाणाऱ्या मोबदल्यात असमानता दिसून येते. आजही अशिक्षित स्त्रियांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी पशुधनाचे व्यवसायिक प्रशिक्षणाच्या संधी महिलांना हव्या तशा उपलब्ध होत नाहीत. बाजारपेठांमध्ये अडत्या किंवा मध्यस्थाशिवाय त्यांना सहजासहजी वावरता येत नाही. गाठीशी पुरेसे पैसे नसल्याने बरेचदा इच्छा असूनही काही व्यवसाय म्हणून करता येत नाही. तसेच तुलनेने महिलांना भांडवल उभे करण्यासाठी पतपुरवठादार ग्रामीण भागात सहजासहजी मिळत नाही. नवीन व्यवसाय सुरु करण्यास आवश्यक तो आत्मविश्वास किंवा मानसिक आधारही अनेक कुटुंबातून महिलांना मिळत नाही. व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी पत म्हणून महिलांच्या नावे स्थावर जंगम मालकीहक्क नसल्याने अडचणी भासतात. साधे पशुधनाची मालकी हक्क नसल्याचे सुद्धा दिसून येते. सांस्कृतिक आणि सामाजिक बंधनाच्या चौकटी, कौटुंबिक जबाबदारी, निर्णय क्षमतेचा अभाव, उत्पन्न मर्यादा, श्रमविभागणी अशा अनेक गोष्टींनी अनेकदा पशुसंवर्धन व्यावसायिक  म्हणून पुढे येण्यात महिलांना अडथळे येतात.

अडचणींचे एवढे भलेमोठे डोंगर असूनही महिलावर्ग अजिबात ही खचून न जाता नवे काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतानाचे आपल्याला दिसते. एकीचे बळ या म्हणीप्रमाणे समविचारी महिलांनी संघटित होऊन प्रयत्न केल्यास अडचणींवर नक्कीच मात करता येईल. आज आपण अमूल या गुजरात राज्यातील दूध संघाचे भव्य उद्योगातील रुप पाहतो. मात्र त्याच्या तळाशी गावपातळीवरील महिला वर्गांनी वेचलेले कष्ट सहज दिसतील. अशिक्षित महिला कामगारांनी आपल्या कुटुंबातील सुशिक्षित मुली मुले यांची मदत घेत पशुपालन क्षेत्राची तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती कायम घेत राहिली पाहिजे. सुशिक्षित महिला कामगारांनी जो व्यवसाय करावयाचा आहे त्याबद्दलची व्याख्याने, माहिती पुस्तक, प्रशिक्षणे, प्रक्षेत्र भेटी अशा माध्यमातून ज्ञानवृद्धी करायला पाहिजे. महिलांसाठी कार्यरत विविध संघटनांनी सेवाभावी संस्थांनी खास महिलांसाठी म्हणून शेळीपालन, दुग्ध पदार्थ निर्मिती व्यवसाय, परसबागेतील कुक्कुटपालन अशा पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण वर्गाचे नियमितपणे आयोजन करायला हवे. काही संस्था किंवा बिगर शासकीय संघटनाच्या माध्यमातून अशी प्रशिक्षणे अथवा कार्यक्रम घेतली जातात मात्र त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच अनेकदा अशी असे कार्यक्रम शेतीतील हंगामी का काळात होत असल्याने महिला भरीव उपस्थिती दर्शवू शकत नाहीत. आज विविध कृषी प्रदर्शनात बचत गटाच्या माध्यमातून अनेक लघुउद्योग करणारे महिलांचे समूह दिसतात. अशांशी संवाद साधत बचत गटाचे व्यवस्थापन आणि निर्मिती व विक्री याबाबत इतर महिलांनी शिकून घेण्याचा प्रयत्न करावा.

निमशहरी किंवा शहरालगतच्या भागातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग वगैरे व्यवसायात उत्तम संधी असतात. जसे देवस्थान लगतच्या भागात पेढे, शहरातील मोठ्या हॉटेल्सला लागणारे दूध, दही, पनीर, खवा, श्रीखंड यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनवणे, पशुधनास लागणारे मुरघास, कांडीखाद्य, खनिज मिश्रणे बनवणे यासारखे लघुउद्योग करता येण्याची शक्यता पडताळून पहावी. गावपातळीवरील पशूसखी किंवा अनेक शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात महिला पशुवैद्यकीय अधिकारी देखील कार्यरत असतात. त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा महिला म्हणून आपण जरूर प्रयत्न करावा. उत्साही स्वयंरोजगारासाठी धडपडणाऱ्या एखाद्या भगिनीस पशुसंवर्धन विषयक माहिती आणि मानसिक बळ देण्यात नक्कीच आनंद वाटेल

शासन स्तरावर महिला केंद्री योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे अनुषंगाने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. मानव विकास निर्देशांकच्या परिमाणात महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि श्रम बाजारातील सहभाग अशा महत्वपूर्ण बाबींवर 2014 च्या महाराष्ट्र शासनाच्या महिला धोरणात समावेश करण्यात आलेला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या माध्यमातून आज महाराष्ट्रात लाखाच्या आसपास बचतगट कार्यान्वित असून सुमारे 15 लाख महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

आज भारतासारख्या विकसनशील देशात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता खाद्यान्नाची मोठी गरज भासणार हे उघड आहे. वातावरणातील बदल, अनियमित पर्जन्यमान, जमिनीचा उतरलेला कस, पीक पद्धतीत झालेले बदल, लागवड क्षेत्रातली घट, अनिश्‍चित बाजारभाव अशा अनेक कारणांमुळे आजच्या काळात “अन्नसुरक्षा” ही बाब महत्वाची होत आहे. अफाट लोकसंख्येला प्रथिनांचा स्वस्त आणि मुबलक स्त्रोत तसेच वनस्पतीजन्य महाग प्रथिनांना भक्कम पर्याय म्हणून दूध, अंडी, मांस अशा प्राणिजन्य प्रथिनांचा आहारामध्ये समावेश वाढत आहे. ही प्राणिजन्य प्रथिने बदलत्या आहारशैलीचा अविभाज्य भाग बनत असल्याने निश्चितच सर्वदूर बाजारपेठेत यास मोठी मागणी आहे, त्यामुळे विविध गटातील महिला भगिनींनी नेमकी ही संधी ओळखून या क्षेत्रात उपजीविका आणि रोजगारासाठी पुढे यायला हवे.

  • माहिती स्त्रोतः डॉ स्नेहल पाटील, पशुधन विकास अधिकारी

 (संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अकोला)


Back to top button
Don`t copy text!