अनैतिक संबंधातून झालेल्या मारहाणीत महिलेचा चाकू घुपसून खून; मुंजवडीच्या पवार वस्तीतील घटना, तिघांविरोधात गुन्हा दाखल


दैनिक स्थैर्य | दि. २२ मार्च २०२३ | फलटण |
मुंजवडी (ता. फलटण) येथील पवार वस्तीत अनैतिक संबंधांच्या कारणावरून चिडून जाऊन घरात घुसून केलेल्या मारहाणीत पोटात चाकू घुपसल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात घबराट उडाली आहे.

सीताबाई किसन सस्ते (रा. पवार वस्ती, मुंजवडी, ता. फलटण) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले, स्वाती रमेश घुले (सर्व राहणार पवार वस्ती, मुंजवडी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबतची तक्रार सौ. प्रमिला सोमनाथ सस्ते (रा. पवार वस्ती) यांनी फलटण पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. १९ मार्च रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास पवार वस्ती (मुंजवडी, तालुका फलटण) येथील फिर्यादी सौ. प्रमिला सोमनाथ सस्ते यांच्या घरात त्या स्वत: व पती सोमनाथ किसन सस्ते व सासू सीताबाई किसन सस्ते बसले असताना त्यांच्या घराशेजारी राहण्यास असलेल्या स्वाती रमेश घुले हिचे व फिर्यादीचे पती सोमनाथ किसन सस्ते यांच्यात असलेल्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून चिडून जाऊन रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले यांनी फिर्यादीच्या घरात त्यांचे पती सोमनाथ सस्ते यांना जीवे ठार मारण्यासाठी घुसून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादीच्या सासू सीताबाई किसन सस्ते यांच्या पोटात चाकू घुसविल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा खून रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले (सर्व राहणार पवार वस्ती, मुंजवडी) यांनी केल्याची फिर्याद सौ. प्रमिला सोमनाथ सस्ते यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रमेश तानाजी घुले, तानाजी राजाराम घुले व स्वाती रमेश घुले (रा. पवार वस्ती, मुंजवडी) अशी आरोपींची नावे आहेत.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी भेट दिली असून या प्रकरणी अधिक तपास पो.नि. गोडसे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!