प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले – पालकमंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१७ जानेवारी २०२२ । सांगली ।  प्रा. एन. डी. पाटील यांनी नि:स्पृहपणे शेतकरी, कामगार वर्गासाठी आयुष्यभर जोमाने संघर्ष केला. अत्यंत अक्रमक शैलीत आयुष्यभर सत्तेच्या विरोधात राहून लढा देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व हरपले, अशा शब्दात जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली .

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रा. एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत पारदर्शीपणे रयत शिक्षण संस्थेने कार्य केले. त्यांच्या निधनाने अनेकांचे नुकसान झाले आहे. विशेषत: वाळवा तालुक्यातील जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. वाळवा तालुक्यातील भूमी क्रांतीकारकांना, विचारवंतांना, समाजसुधारकांना जन्म देणारी भूमी आहे. या भूमीत प्रा. एन. डी. पाटील यांचा ढवळी येथे जन्म झाला. शिक्षणाच्या सामर्थ्यावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी गाठलेली मजल मोठी आहे. ती गाठत असताना सत्तेच्या वळचणीला न बसता, संघर्ष हाच आपल्या आयुष्याचा प्रमुख भाग बनविला. प्रा. एन. डी. पाटील हे शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्नांची तड लावणारे नेतृत्व होते. कोल्हापुरात राहून त्यांनी कोल्हापूरकरांच्या अनेक प्रश्नांची तड लावली. अशा या थोर नेत्याला भावपूर्ण श्रध्दाजंली!

दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!