
स्थैर्य, फलटण, दि. २० सप्टेंबर : आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ‘राजे गट’ प्रचाराचा नारळ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून फोडणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नुकतेच श्रीमंत संजीवराजे यांचा वाढदिवस अत्यंत भव्य स्वरूपात साजरा करण्याचे संकेत दिले आहेत.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही घोषणा केली होती. त्यानंतर, त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘लक्ष्मी-विलास पॅलेस’ या निवासस्थानी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या सप्ताहव्यापी सोहळ्यात फलटण तालुक्यात सायकल वाटप आणि महिलांना साडी वाटप करण्यासारखे मोठे सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित होत असलेले हे कार्यक्रम म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ‘राजे गटा’च्या प्रचाराचीच सुरुवात असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.