शरद पवार “माढा” लोकसभा महादेव जानकर यांना सोडणार ?; जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार ?


दैनिक स्थैर्य | दि. 22 फेब्रुवारी 2024 | फलटण | आगामी लोकसभा निवडणुकी काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. यामध्येच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार हे लोकसभेसाठी निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच महादेव जानकर यांना सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री महादेव जानकर यांच्यामध्ये फोनवरून बोलणे झाले असल्याची माहिती समोर येत असून महादेव जानकर यांनी महाविकास आघाडी सोबत यावे; असा आग्रह शरद पवार यांनी धरला आहे. तर माढा व परभणी अश्या लोकसभेच्या दोन जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी महाविकास आघाडीने द्याव्यात; अशी मागणी जानकर यांनी केली असल्याचे समजत आहे. त्यावर शरद पवार यांनी परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विद्यमान खासदार असल्याने “आपण माढा बाबत चर्चा करू” असे स्पष्ट केले असल्याची माहिती समोर येत आहे.

2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार प्रचंड बहुमताने निवडून गेले होते. 2014 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघांमधून निवडून गेले. 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत माढा लोकसभेची उमेदवारी घेत माढा लोकसभा मतदारसंघावर प्रथमच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला आहे.

2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत विजयसिंह मोहिते – पाटील असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग हा सुकर झालेला होता. परंतु 2019 नंतर बऱ्याच राजकीय उलथापालथी ह्या माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत. मोहिते – पाटील व खासदार रणजितसिंह यांच्यामध्ये पूर्वीसारखे सख्य आता राहिलेले नाही. यामध्येच जर शरद पवार यांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेत माढा लोकसभा मतदारसंघांमधून त्यांना पाठिंबा दिला तर येणाऱ्या काळात नक्कीच चित्र वेगळे दिसेल; असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!