दैनिक स्थैर्य | दि. २६ जुलै २०२४ | मुंबई |
संत नामदेव महाराजांनी शांती, समता व बंधुता हा विचार जोपासत महाराष्ट्रासह उत्तर भारतात भागवत धर्म प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य केले आहे. हे कार्य पुढे नेण्यासाठी राज्य शासन भरघोस निधीची तरतूद करेल तसेच शासकीय स्तरावर संत नामदेव महाराज यांचा समाधी सोहळा साजरा करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी महाराष्ट्रातून भागवत धर्माची पताका उत्तर भारतात घेऊन जात भक्ती-प्रेमाचा प्रचार प्रसार करणारे संत नामदेव महाराज यांच्या पंजाब येथील स्थानास भेट दिली. परतल्यावर त्याचा इतिवृत्तांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. त्याचबरोबर श्री क्षेत्र घुमाण येथील श्री नामदेव दरबार कमिटी यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिलेली श्री विठ्ठल – नामदेवांची प्रतिमा मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावेळी त्यांनी संत नामदेव महाराज व वारकरी सांप्रदाय याविषयी आदरभाव व्यक्त केला.
याप्रसंगी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनीत सबनीस आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संत नामदेव महाराजांविषयी निर्वाज्य प्रेम करणारे शीख बांधवांचे कार्य मोठे आहे. आपण देखील श्री क्षेत्र घुमाणसाठी आपले भरघोस योगदान देऊन नामदेवरायांची निश्चित सेवा करू. संत नामदेव महाराज यांचा समाधी दिन मोठ्या प्रमाणात साजरा करू. संत श्री नामदेव महाराजांचे साहित्य व विचार जगभरात पोहचवूयात. लवकरच घुमान, पंजाब येथे देखील भेट देऊन दर्शन घेऊ. मागील अनेक दिवस ते राहून गेलं आहे. समाधी सोहळ्यादिनी महाराष्ट्र व पंजाब येथील मान्यवर व सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.