दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यामध्ये महावितरणकडून वारंवार मनमानी कारभार सुरु असल्याने शेतकरी व ग्राहकांवर होणारा अन्याय कदापी सहन केला जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना दिला आहे.
फलटण येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे, ज्ञानेश्वर चौधरी, निलेश जगताप, सपन रणवरे, सैफ शेख व शंकरराव वाघमारे यांनी याबाबत सविस्तर दिले. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे बोलत होते.
महावितरण कंपनीकडून शेतकरी व ग्राहकांवर वारंवार अन्याय होत असून आपल्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण डि.पी. बंद करुन शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. त्यासोबतच फॉल्टी मिटर, बिलाची चुकीची आकारणी, चुकीचे रिडींग व प्रत्यक्ष वीज वापर देण्यात आलेले विज बील याच्या आकडेवारी मध्ये मेल नाही. त्यामुळे त्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. याबाबत वायरमेन ते कार्यकारी अभियंता यांच्यावर शेतकऱ्यांना अवाजवी बिले दिल्याबाबत जबाबदार
धरुन त्यांच्यावर कर्तव्यात कसूर, शेतकऱ्यांची फसवणूक व भ्रष्ट आचार करणे असे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून विज बिले भरणार आहेत. परंतू शेतकऱ्यांना महावितरणने दिलेली बिले ही योग्यच आहेत कि याची खातरजमा कारखाने करणार आहेत का ? ऊस उत्पादक शेतकऱ्यां व्यतिरिक्त तालुक्यात विविध प्रकारच्या फळ बागा व अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. मग या शेतकऱ्यांच्या पिकांचे काय ? यांना वाली कोण ? महावितरण व राज्य शासन यांच्यात एक करार झाला असून त्या अन्वये
महावितरणने २४ तास अखंडपणे विज ग्राहकाला विज पुरवठा करणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास प्रती तास महावितरणने शेतकऱ्यांना, ग्राहकांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. परंतू या कराराचे पालन होताना दिसून येत नाही, असेही जिल्हा उपाध्यक्ष युवराज शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागातील डि. पी. विज बिले न भरल्याचे कारण देत महावितरणने अचानकपणे ग्राहकांना कोणतीही पूर्व सुचना न देता बंद ठेवले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची हाता तोंडाशी आलेली पिके पाण्याअभावी जळून गेली आहेत. शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरणने अचानकपणे डि पी. बंद ठेवल्याने व त्या डि. पी. वरील ज्या शेतकऱ्यांनी विज बिले वेळोवेळी भरलेली आहेत. त्यांचाही विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. हा प्रकार नियमितपणे विज बिले भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर निवेदनामध्ये शिंदे यांनी स्पष्ट केले आहे कि, अनेकदा ग्रामीण भागातील डि. पी. नादरुस्त झाल्यावर त्याच्या दुरुस्तीसाठी महावितरण शेतकऱ्यांना वेठीस धरुन त्याच्याकडूनच महावितरण डी. पी. दुरुस्तीसाठी पैसे वसूल केले जातात. ही बाब पूर्णपणे बेकायदेशीर असून व शेतकरी, ग्राहक यांच्या न्याय हक्कावर गदा आणणारी आहे. असे नियमबाहवरित्या पैसे गोळा करणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. गेल्या १० वर्षात महावितरणच्या चुकीमुळे अनेकदा शेतकऱ्यांची पिके जळून झालेले नुकसान, पशुधन व जिवीत हानी या घटना घडलेल्या आहेत. त्याबाबत नुकसान भरपाईची आकडेवारी महावितरणने सार्वजनिकरीत्या जाहिर करावी. विद्युत वाहिनीखाली व डि.पी. परिसरात वाढलेली झाडे तोडण्यासाठी महावितरणला निधी मंजूर असतो. परंतू या निधीचा वापर कोठेही झालेला आढळून येत नाही. त्यामुळे हा निधी नेमका जातो कोठे याचे स्पष्टीकरण मिळावे.
ग्रामपंचायत हददीतील शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत वाहिनी व विद्युत खांब रोवून विज पुरवठा केला जातो. त्या विज खांबाचे परिसरातील शेतीचा भाग पडून राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याबाबत महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी भाडे दिले जाते. कोणत्याही शेतकऱ्यांना भाडे दिल्याचे दिसून येत नाही. तो निधी जातो कोठे ? याचेही स्पष्टीकरण मिळावे. तरी वरील सर्व बाबींचा विचार होवून अचानकपणे शेतकऱ्यांचे डि. पी. बंद करु नयेत व खंडीत केलेले विज कनेक्शन पुर्ववत सुरु करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपणा विरोधात तीव्र आंदोलन छेडेल याची नोंद घ्यावी, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, उपतालुका अध्यक्ष निलेश जगताप, शंकरराव वाघमारे, सपन रणवरे व सैफ शेख उपस्थित होते.