दैनिक स्थैर्य | दि. 26 मार्च 2024 | फलटण | महायुतीच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत असणाऱ्या आमदार व पदाधिकाऱ्यांची बैठक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे उद्या आयोजित केली आहे. यामध्ये माढ्याचा तिढा सोडवण्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना यश येते का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघावर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दावा केला होता. माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावा अशी आग्रही मागणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती.
महायुतीच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवार घोषित केल्याने माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागितली होती. परंतु महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघांमधून उमेदवार घोषित केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला माढा लोकसभा मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत असणारे मतभेद दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे माढा लोकसभा मतदारसंघांमधील आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
उद्या पुणे येथे होणाऱ्या बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा गट नक्की काय भूमिका घेणार? भाजपाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी श्रीमंत रामराजे यांचा गट काम करणार ? की अन्य भूमिका घेणार ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.