दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२४ | फलटण |
माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार न करता फलटणमधील राजे गट यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला. आज मुंबई येथे होणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात या विषयावर अजितदादांनी शिस्त भंगाची कारवाई करण्याबाबत विचार होणार का? असा सवाल फलटण नगर परिषदेतील गटनेते अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे.
वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्षपद श्रीमंत संजीवराजे यांच्याकडे असताना व संक्रांतीच्या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाभिमुख नेतृतवास साथ देत सत्तेत सहभागी होऊन फायदा घ्यायचा व युती धर्माचे पालन करायचे नाही, हा मिठाचा खडा राजे गटाने महायुतीत टाकलेला आहे, असे अशोकराव जाधव यांनी म्हटले आहे.
श्रीमंत रामराजे व त्यांच्या गटाने विरोधात केलेल्या कामाची पक्षपातळीवर चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी व विकासकामांना देणार्या निधीबाबत विचार करावा, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत विश्वासू व फलटण नगर परिषदेचे गटनेते अशोकराव जाधव यांनी केली आहे.