
स्थैर्य, फलटण, दि. १६ सप्टेंबर: मानवी आरोग्यासाठी रानभाज्यांचे असलेले महत्त्व आणि त्यांची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, या उद्देशाने येत्या २० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता, जिल्हा परिषद शाळा, धुमाळवाडी (फळांचे गाव) येथे ‘रानभाजी ओळख व संवर्धन’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आणि निशुल्क आहे.
पुण्याचे मॉडर्न महाविद्यालय, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, महाराष्ट्र जैवविविधता मंडळ (नागपूर) आणि कृषी विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रोजच्या आहारात पौष्टिक रानभाज्यांचा समावेश वाढावा आणि त्यांच्या संवर्धनात नागरिकांचा सहभाग वाढावा, हा यामागील मुख्य हेतू आहे.
या कार्यशाळेसाठी आमदार सचिन पाटील, मॉडर्न महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्राची क्षीरसागर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार फरांदे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अजय शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ज्या नागरिकांना रानभाज्यांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांनी आपल्याकडील रानभाज्यांच्या नमुन्यांसह उपस्थित राहावे. तालुक्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी या कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.