स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१०: कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी 2005 मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी केलेल्या वक्तव्याचा पुनरोच्चार त्यांनी केला. मोदींनी शरद पवारांवर टीकास्त्र साधले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी बोलत होते. दरम्यान सुप्रिया सुळेही सभागृहामध्ये उपस्थित होत्या.
‘एपीएमसी कायदा बदलला आहे असे गर्वाने कोण सांगत होते, 24 असे बाजार उपलब्ध झाल्याचे कोण सांगत होते…युपीएच्या काळात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारमधील तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार होते. शरद पवार आज अचानक उलट बोलत आहेत. आता यामुळे त्यांची भूमिका शंका निर्माण करणारी आहे. शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार अशी भाषा का करत आहेत? असा सवाल पंतप्रधान मोदींनी पवारांना केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी शरद पवारांनी त्या वेळी दिलेले एक उत्तर वाचून दाखवले आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या हितासाठीच एपीएमसी सुधारणांना चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांचा वेगळा पर्याय मिळावा. जास्त व्यापारी नोंद झाल्यानंतर स्पर्धा वाढेल आणि बाजार समित्यांचे जाळे संपेल असे पवार त्यावेळी म्हणाले होते’. यामुळे शरद पवारांची बदलेली भाषा ही आपण समजून घ्यायला हवी, असा टोलाही पंतप्रधानांनी लगावला.