सुशांतने कोणाची झोप उडवलीय?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सुशांतसिंग राजपूत याच्या शंकास्पद मृत्यूचे प्रकरण शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे एक असे प्रकरण आहे, की त्यातून राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. कारण त्यात ठामपणे सीबीआय चौकशीची मागणी पहिल्या दिवसापासून सुरू झालेली होती आणि तितक्याच ठामपणे सरकारने त्याचा साफ़ इन्कार केलेला आहे. जसजसे दिवस जात आहेत, तशी मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून घेण्याच्या मागणीचा पाठींबा वाढत असून; त्याचे राजकीय परिणामही दिसू लागले आहेत. अचानक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र त्यात उतरले आहेत. लोकसभेत पराभूत झालेले पार्थ पवार यांनी अज्ञातवासातून बाहेर येऊन प्रथमच एक राजकीय मागणी केली आणि ती नेमकी सुशांतच्या तपासाचे काम सीबीआयकडे देण्याची असावी, याला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. कारण त्यांनी वक्तव्य करून वा जाहिर भाषणातून अशी मागणी केलेली नाही. त्यांनी तसे रितसर पत्रच राज्याच्या गृहमंत्र्यांना सादर केलेले आहे. त्याचा अर्थ त्यांनी त्यासाठीचा कायदेशीर पुरावा ठरू शकणारा दस्तावेजच निर्माण केलेला आहे. त्याच प्रकरणाला चुड लावणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या विविध आरोपात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा केलेला प्रयासही विसरता कामा नये. तरच त्यातले राजकारण उलगडू शकेल. कारण पर्यावरण मंत्री मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत आणि पार्थ पवार उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत. मग सुशांतच्या मृत्यूच्या आडून राज्यातल्या महाआघाडी सरकारमधले कुरघोडीचे राजकारण रंगलेले आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. ही थोडी पार्श्वभूमी समजून घेतली तर राजकारणाचे धागेदोरे शोधता येऊ शकतील.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे चुलत बंधू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात भाग घेताना राज्याचे मुख्यमम्त्री घराबाहेर पडत नाहीत, रस्त्यावर दिसत नाहीत. फ़क्त टेलिव्हिजनवर दिसतात, असे चिमटे काढलेले आहेत. पण आदल्याच दिवशी मुख्यमंत्री थेट पुण्याला गेलेले होते. ते पुण्यात कोणत्या कार्यक्रमाला गेले, त्याचा खुलासा फ़ारसा झालेला नाही. अधिकार्‍यांच्या बैठका झाल्या. पण उद्धवरावांच्याच आग्रहाला ग्राह्य धरायचे तर अशा बैठका व्हिडीओ कॉन्फ़रन्सद्वारेही होऊ शकतात. अयोध्येतील भूमीपूजन त्या पद्धतीने होण्याचा मुद्दा मांडणार्‍या मुख्यमंत्र्यांना अचानक पुण्यात जाण्याचे कारण काय असेल? की उपमुख्यमंत्री पुण्यातच ठाण मांडून बसलेत आणि मुंबईत यायलाच राजी नाहीत, म्हणून स्वत: उद्धवराव पुण्याला पोहोचले? तसे असेल तर त्यामागे काही तातडीचे काम असू शकेल. ते काम व्हिडीओ माध्यमातून होऊ शकणारे नसावे. कारण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यावर अनेक उपकरणे बोलाचाली वा संवाद परस्पर चित्रीत करून घेऊ शकतात. काही विषय तसेच असल्याने पुण्याला व्यक्तीगत जाण्याची निकड भासलेली असावी काय? अजितदादांना प्रत्यक्ष भेटून काही सांगावे, असे वाटल्याने तंत्रज्ञानाचा आग्रह विसरून मुख्यमंत्री पुण्याला पोहोचले होते काय? अनेक प्रश्न आहेत व त्यांची उत्तरे शोधुनही मिळत नाहीत. मात्र दुसरीकडे दिवसेदिवस सुशांतच्या शंकास्पद मृत्यूचे गुढ आहे, त्यापेक्षा त्याच्या पोलिस तपासाचे गुढ अधिक रहस्यमय होत चालले आहे. पोलिस जितका तपास करत आहेत, त्यातून कुठलाही उलगडा होण्यापेक्षा अधिकच रहस्ये व प्रश्न समोर येत आहेत. कारण महिना उलटून गेल्यावर आता विविध नेते व पक्ष त्यात उडी घेऊ लागले आहेत आणि जिथे ही घटना घडली, त्या राज्याचे कारभारी मात्र त्याची झाकपाक करून घेण्यात गर्क दिसतात.

तब्बल एक महिना उलटून गेल्यावर सुशांतच्या कुटुंबियांनी चक्क बिहारची राजधानी पातण्यात त्याची गर्लफ़्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात फ़ौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदलेला आहे आणि एकूणच मुंबईतील तपासाला वेगळे वळण लागून गेले. आधी मुंबईचे पोलिस खर्‍या संबंधितांना चौकशीला बोलवित नाहीत असा आरोप होता. त्यामध्ये करण जोहर इत्यादी नावे होती. चाळीसहून अधिक लोकांची चौकशी वा जबानी झाल्यावर आता पाटण्याच्या त्या फ़ौजदारी तक्रारीने धमाल उडवून दिलेली आहे. त्यात आरोपी ठरवण्यात आलेल्या रिया चक्रवर्ती हिने आरंभी तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केलेली होती. आता तिनेही भूमिका बदलली असून तपास मुंबईचे पोलिसच योग्य करती्ल, असे तिचे म्हणणे आहे. किंबहूना त्यासाठी तिने सुप्रिम कोर्टात धाव घेतलेली आहे. मग असा प्रश्न पडतो की आरंभीच्या काळात तिने सीबीआयची मागणी कशाला केलेली होती? हे तिचे बदलणे शंकास्पद नाही का? जोवर मुंबई तपासात तिच्याकडून कुठली जबानी घेतली गेली नाही, तोपर्यंत रियाला सीबीआयचा तपास विश्वासार्ह वाटत होता. पण कुटुंबियांनी तीच मागणी केल्यावर रियाने पवित्रा बदलण्याचे कारण काय? अगोदर तिचा मुंबई पोलिसांवर विश्वास कशाला नव्हता? की तिला मुंबई पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर रियामध्ये बदल झाला आहे? असा कुठला विश्वास तिला मुंबई पोलिसांनी दिला आहे? अशा प्रश्नांची उत्तरे कुठे मिळत नाहीत. सर्व लोक सुशांतला न्याय मिळावा असा आग्रह धरतात. पण प्रत्येकाचा न्याय वेगवेगाळा असण्याची शक्यता अधिक आहे. कारण सर्वांनाच न्यायापेक्षा तपासकामात जास्त रस आहे आणि त्यातही तपास कोण करणार, यालाही जास्त महत्व दिले जात आहे. थोडक्यात मृत्यू एकच असला तरी संबंधित प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार तपासकाम व्हावे असेच वाटते आहे. हा प्रकार चमत्कारीक नाही काय?

जेव्हा सत्यशोधनात इतके मतभेद असतात, तेव्हा प्रत्येकाचे सत्य वेगवेगळे असण्याची शक्यता वाढत जाते. असा प्रकार फ़क्त सुशांतचे निकटवर्तिय, कुटुंबिय किंवा चित्रसृष्टीपुरते मर्यादित नाहीत. राजकारणातही तसेच मतभेद आहेत. सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाला त्यात मुंबई पोलिस हवेत आणि दुसर्‍या पक्षाला सीबीआयकडे तपास सोपवावा असे वाटते आहे. प्रत्येकजण आपली कातडी बचावण्यासाठी झटतो आहे, की अन्य कुणाला तरी गुंतवण्यासाठी डावपेच खेळतो आहे? शुक्रवारी विरोधी पक्ष भाजपाच्या काही नेत्यांनी सीबीआयची मागणी केली आणि काहीजणांनी तर तरूण मंत्री त्यात गुरफ़टला आहे, असेही आरोप केलेले आहेत. त्यामुळे एकूण प्रकरणाला अजब वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याहीपेक्षा एक वेगळी बाजू अशा मृत्यूला आहे. इतरवेळी कुठल्याही राजकीय सामाजिक विषयावर आपली बहूमोल मते व्यक्त करायला पुढे सरसावणार्‍या चित्रपटसॄष्टीची सुशांतच्या बाबतीत दातखिळी बसली आहे. गुजरातच्या दंगलीपासून अखलाखच्या सामुहिक हत्येपर्यंत कुठल्याही बाबतीत आपली अक्कल पाजळायला सरसावणारे जावेद अख्तर, मुकेश भट्ट इत्यादी एकाहून एक प्रतिभावंत मौन धारण करून गायब झालेले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील एका गंभीर घटनेविषयी सार्वत्रिक चर्चा रंगलेली असताना त्यांचेही मौन चकीत करून सोडणारे आहे. अन्यथा संबंध नसतानाही अशी मंडळी जगासाठी चिंताक्रांत झालेली आपल्याला बघायला मिळत असतात. आपली प्रतिष्ठा व पुरस्कारही फ़ेकून द्यायला धावत सुटत असतात. पण सुशांत प्रकरणात मात्र त्यांची वाचा बसलेली आहे. याचा अर्थच कुठेतरी मोठे दहशतीचे वातावरण नक्की आहे. प्रत्येकाचे हातपाय वा शेपूट कुठे ना कुठे अडकलेले असणार. अगदी माध्यमातही नेहमी आक्रमक असणारे यावेळी तोंड संभाळून बोलताना दिसावेत, ही नवलाईची गोष्ट आहे.

इथे माहाराष्ट्राच्या राजकारणाचा संबंध कुठे येतो? अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात वास्तविक सीबीआयकडे तपासाचे काम गेले असते तर राज्याच्या व मुंबईच्या पोलिसांना दिलासा मिळू शकला असता. कारण निदान त्यांच्यामागे सतत कॅमेरा घेऊन धावणार्‍यांचा ससेमिरा तरी टळला असता. पण जितक्या आवेशात राज्याचे गृहमंत्री वा सरकार त्याला ठामपणे नकार देत आहेत, तेही शंकास्पद आहे. समजा केंद्राकडे तपासाचे काम गेल्याने राज्यातील सरकारचे अवमूल्यन अजिबात होत नाही. अनेकदा राज्येच डोक्याला ताप नको म्हणून केंद्राकडे वा सीबीआयकडे प्रकरणे सोपवित असतात. काही प्रसंगी संबंधितांना समाधानी करण्यासाठी न्यायालयेही राज्याकडून तपासकाम सीबीआयकडे सोपवीत असतात. पण जेव्हा आपणच तपास करण्याचा अट्टाहास राज्याकडून होतो, तेव्हा काहीतरी गडबड असल्याचा संशय वाढत जातो. विविध चिटफ़ंड प्रकरणात बंगालच्याच पोलिसांचा तपास संशयास्पद ठरला, तेव्हा ते काम सुप्रिम कोर्टाने सीबीआयकडे सोपवलेले होते. जितका तपास झाला होता, त्याचे दस्तावेज सोपवायचीही कोलकाता पोलिसांनी टाळाटाळ केलेली होती. फ़ार कशाला ती चौकशी करायला सीबीआयचे अधिकारी पोहोचले, तर ममतांनी त्यांनाच अटक करण्यापर्यंत मजल मारली होती. कारण त्यात मनता बानर्जी व त्यांच्या पक्षाच्याच अनेक सहकार्‍यांचे हात गुंतले असल्याचे पुरावे समोर येत चालले होते. तिथे ममतांनी जसा कडाडून सीबीआयला विरोध केला, त्यापेक्षा महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांचा तपास सोडण्याला असलेला नकार वेगळा आहे काय? जे सुशांत प्रकरणात आहे, तेच पालघरच्या तपासातही झालेले आहे. दोन्ही बाबतीत कोर्टापर्यंत सीबीआयची मागणी गेलेली आहे आणि त्यात राज्य सरकारची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळेच सुशांतच्या मृत्यू संदर्भाने होत असलेले आरोप व त्यावर सरकारचा पवित्रा गोंधळात टाकणारा आहे.

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कंगनाने आरंभ केलेल्या दोषारोपामध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवाचे नाव घेतलेले होते आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रानेच सीबीआयची मागणी केलेली आहे. याचा परस्पर संबंध जोडल्यास कुठेतरी महाविकास आघाडीत अंतर्गत कुरबुरी व कुरघोडीचे राजकारण सुरू झालेले आहे. ते पारनेर व सिन्नरच्या नगरसेवकांना फ़ोडण्यापुरता विषय नसून काही संकेत दिले जात आहेत. ऐंशी तासांच्या सरकारनंतर अजितदादा काय म्हणाले होते? योग्य वेळ आल्यावरच त्याचा खुलासा करीन. मात्र त्यांनी अजून तरी त्याविषयात खुलासा केलेला नाही आणि देवेंद्र फ़डणवीस तर त्यावर मोकळेपणाने आपल्या मुलाखतीत बोलून गेलेले आहेत. दादांची योग्य वेळ जवळ येत चालली आहे काय? त्यासाठी कुठले निमीत्त शोधले जाते आहे काय? लोकसभेत आपल्या पुत्राचा पुत्राचा झालेला पराभव दादांनी सहज पचवलेला आहे काय? की त्याची खदखद मनात अजूनही शिल्लक उरलेली आहे? कारण पवार कुटूंबातील पार्थ पवार ही पहिली व्यक्ती आहे, जिने सार्वत्रिक निवडणुकीत पराभव पत्करला आहे. त्याचे वैषम्य संपलेले असेल? की आता त्याचा एकूण हिशोब करण्याचाही प्रयास आहे? सुशांतचा शंकास्पद मृत्यू हे त्यासाठीचे निमीत्त होऊ शकेल काय? त्यात कंगनाने थेट कुणाचे नाव घेणे, मग पार्थ पवारांनी गृहमंत्र्यांना पत्र देणे आणि त्याच दरम्यान सुशांतच्या कुटुंबाने पाटण्यात वेगळा झिरो एफ़ आय आर दाखल करणे ह्या सर्व वेगवेगळ्या घटना आहेत काय? की पटकथेनुसार चाललेले नाटक आहे? सगळ्या जगाचे लक्ष राजस्थानात वेधलेले असताना महाराष्ट्रात काही हालचाली सुरू आहेत काय? त्याची सुत्रे एकाचवेळी दिल्ली, पाटणा व पुणे येथून हलवली जात असावीत काय? सुशांतच्या मृत्यूचे कथानक जितके गुढ आहे, तितकेच त्याच्या आधाराने इथे मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात होणारे काही प्रकार बुचकळ्यात टाकणारे आहेत ना?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!