गांजा विक्रीसाठी नेत असताना दोघे बोरगाव पोलिसांच्या जाळ्यात ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नागठाणे, दि.९: अवैधरित्या गांजा विक्रीसाठी नेत असताना बोरगाव पोलिसांनी सापळा रचून दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.गुरुवारी सायंकाळी अपशिंगे (मि.) गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.संशयितांकडून     १६,५०० रुपये किमतीचा ४ किलो गांज्यासह एक दुचाकी व मोबाईल्स असा सुमारे ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी बाळू हणमंत चव्हाण (वय.४३,रा.सातारा रोड, ता.कोरेगाव) व नाना महादेव मसगुडे (वय.५०, रा.अपशिंगे (मि.),ता .सातारा) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक केली आहे.
     याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,अपशिंगे (मि.) गावच्या हद्दीतून दोघेजण चोरून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना गुरुवारी मिळाली.या माहितीच्या अनुषंगाने गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी अपशिंगे (मि.) ते देशमुखनगर जाणाऱ्या रस्त्यालगत वाघजाई मंदिराजवळ सापळा रचला.यावेळी एका दुचाकीवरून आलेले दोन इसम तेथे असल्याचे आढळले.पोलिसांनी छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले.यावेळी पोलिसांना या दोघांजवळ एक प्लास्टिक पोते आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या पोत्यात गांजा असल्याचे निदर्शनास आले.
         यावेळी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बाळू हणमंत चव्हाण व नाना महादेव मसुगडे असल्याचे सांगून हा गांजा सातारा येथे विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले.पोलिसांनी त्यांच्याकडून ४ किलो वजनाचा गांजा,एक दुचाकी व तीन मोबाईल्स असा ४४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत या दोघांना रात्री उशिरा अटक केली.कारवाईत सपोनि डॉ.सागर वाघ,हवालदार मनोहर सुर्वे,किरण निकम,स्वप्नील माने,विजय साळुंखे,राहुल भोये,विशाल जाधव,सातारा येथील अपर तहसीलदार सोपान टोपे यांनी कारवाईत सहभाग घेतला.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि डॉ.सागर वाघ करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!