दैनिक स्थैर्य । दि.२ जुलै २०२१ । नाशिक । मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेला शतकांचा इतिहास असून अनेक कर्मवीरांचे संस्थेच्या जडण घडणीत महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे या संस्थेच्या रचलेल्या पायाला अधिक भक्कपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या आर्किटेक्चर व पॉलिटेक्निकल महाविद्यालयात आधुनिक काळाची आणि उद्योगांची गरज लक्षात घेऊन आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरावी, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उद्घाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, उपसभापती राघोनाना आहिरे, चिटणीस डॉ. सुनिल ढिकले आणि मविप्र संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, येणाऱ्या काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता राहणार आहे. यामध्ये आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून ग्रीन बिल्डिंगची संकल्पना अधिकाधिक राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणाची देण्याची आवश्यकता आहे. तसेच शैक्षणिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्यासाठी शासनामार्फत वर्षाला 65 हजार कोटी रुपये अनुदान शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांवर खर्च केला जात आहे. तसेच शिक्षण घेण्याचा हक्क समाजातील प्रत्येक व्यक्तीला असल्याने शासन नेहमी शिक्षणाला प्राधान्य देते आहे. त्यामुळे मविप्र संस्थेच्या विविध उपक्रमाला पाच कोटीची मदत जाहीर करत असून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे मविप्रपणे करावे, अशी अपेक्षा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयाची पाहणी केली असता संपूर्ण महाराष्ट्र व मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचे अप्रतिम असे वर्णन संग्रहालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच उदाजी महाराज यांचा शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे काम मविप्र संस्था करत आहे. तसेच या संस्थेतून शिक्षण घेवून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभा राहणारा असावा यासाठी या संस्थेच्या प्रत्येक प्राध्यापक, शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे मत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे नाशिकमध्ये झाली आहेत. त्यामुळे मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिक शहर पुढे येत आहे. विकासाचा हा वेग कायम राहण्यासाठी नागरिकांना दळणवळणाच्या अधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी निधीची भरीव तरतूद करण्यात येणार आहे. तसेच प्रस्तावित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय लवकर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
गरीबांच्या शिक्षणासाठी संस्थेने काम करावे : छगन भुजबळ
सत्यशोधक चळवळीचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येऊन ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ ही ब्रीद वाक्य घेऊन मविप्र ही संस्था गेल्या 107 वर्षापासून समाजाला आपली सेवा देत आहे. सत्यशोधक विचारसरणीवर काम करून बहुजन समाजाची सेवा करावी. अतिशय सुंदर आणि प्रेक्षणीय असे संग्रहालय निर्माण करण्यात आलेले आहे. संस्था अधिकाधिक उज्ज्वल कशी होईल, गरिबांना शिक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच कोरोनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी मदत होईल, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, नाशिकचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर नामकरण, राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज नवीन इमारत उदघाटन आणि उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय लोकार्पण करुन प्रत्येक स्थळाची पाहणी करुन माहिती घेतली. तसेच त्यांनी यावेळी स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले व सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी मानले आहे.