फुकट मिळणारे रेशन धान्य गेले कुठे?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०३ : कोरोनाचे संकट मार्च महिन्यात जिल्ह्यात डेरे दाखल झाले. तेव्हाच शासनाने प्रति माणसी 5 किलो फुकट तांदूळ, गहू देण्याची योजना राबवली. त्यामुळे गरिबांच्या ताटात घास दिसू लागला होता. मात्र, गेल्या जुलै महिन्यात सातारा जिल्ह्यातील मोफतचे धान्यच वाटप झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समजतो आहे. अगोदर लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद, रोजगार बंद आहे. त्यात मोफत होणारे रेशन धान्य वाटप बंद असल्याने गरिबांच्या घरातली चूल पेटणार कशी? असा सवाल सर्वसामान्य विचारू लागले आहेत. दुकानावर म्हणतात वरून धान्यच आले नाही, तर लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

संकटे आणि म्हणजे एकामागून एक येतात. कोरोनाचे संकट सगळ्या संकटांना सोबत घेऊन आले आहे. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाले त्यानंतर शासनाने सर्वसामान्य नागरिकांना मोफत 5 किलो गहू तांदूळ, धान्य देण्याची योजना सुरू केली. त्या योजनेमुळे ज्यांचे व्यवसाय बंद झाले आहेत, ज्यांचा रोजगार थांबला आहे, अशा गरिबांना या योजनेचा फायदा झाला. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानातून मोफत रेशनचे वाटप करण्यात येत होते. गावोगावी त्याचे पुरवठा विभागाकडून नियोजन झाले होते.मात्र जुलै महिन्यात या मोफत धान्याचा एक कणही वाटप झाला नसल्याचा प्रकार काही नागरिकांनी तरुण भारतकडे मांडला आहे.

जिल्ह्यात सध्या अनेक जण कोरोनामुळे घरीच आहेत. रेशनच्या धान्यावर कसेबसे त्यांच्या कुटूंबाची गुजराण होत होती. मात्र, जुलै महिन्यात धान्य वाटप झाले नसल्याने अनेकांनी रेशन धान्य दुकानदारांकडे विचारणा केली तेव्हा या महिन्यात धान्य आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक लाभार्थी निराश होऊन आपले जीवन जगत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नियम बदलून माणसी 5 किलो गहू, तांदूळ दिला जाणारा हा फक्त केवळ तांदूळ दिला जात होता. आता नव्याने 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याचा प्रस्ताव पुरवठा विभागाचा आहे. परंतु जिल्ह्यात मोफत वाटप होणारे धान्य आणि बीपीएल वरच्या रेशन कार्ड धारकांना ही रेशनचे धान्य वाटप झाले नसल्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळे रेशन दुकानावर मोफत धान्य कधी मिळणार याकडे नजरा लागून राहिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानादाराना देण्यात येणारा धान्य पुरवठा हा जुलै महिन्यात झाला नाही.हे समजताच पुरवठा विभागात चौकशी केली असता पुण्यावरूनच धान्य आले नाही. वाहने नसल्याने धान्य आले नसल्याचे सांगण्यात येते.एकट्या सातारा तालुक्यातील 68 हजार लाभार्थी असून त्याकरता 105 गाड्या धान्य लागते, असे समजते. मोफत रेशनचे धान्य वाटप झाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सध्या लॉकडाऊनमध्ये लोकांना फक्त जगण्यासाठी आधार हवा आहे आणि त्याकरता जेवणाच्या ताटात शिधा हवा आहे. हाताला रोजगार, कामधंदा नसल्याने मोफत रेशनचा आधार होता तो ही जुलै महिन्यात मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून गत महिन्यात काहीच का कार्यवाही केली नाही. रेशन दुकानदारांनी पैसे भरून ही त्यांना रेशनचे धान्य पोहचले नसल्याचे समोर येत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे अक्षम दुर्लक्ष होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!