दैनिक स्थैर्य । दि. १० एप्रिल २०२३ । मुंबई । काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) केंद्र सरकारवर टीका करताना वारंवार उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना ‘बेनामी कंपन्यांकडून’ मिळालेल्या 20,000 कोटी रुपयांचा हिशेब विचारत आहेत. आता खुद्द अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब मांडला आहे. गौतम अदानी ग्रुपचे म्हणणे आहे की, 2019 पासून ग्रुप कंपन्या सातत्याने त्यांचे स्टेक विकत आहेत. यातून $2.87 अब्ज (सुमारे 23,500 कोटी रुपये) इतकी रक्कम मिळाली आहे. यापैकी $2.55 अब्ज (सुमारे 20,900 कोटी रुपये) व्यवसाय विस्तारासाठी पुन्हा गुंतवले गेले आहेत.
राहुल गांधींचा आरोप
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूह आधीच खूप अडचणीत आला आहे. यातच गौतम अदानींच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसदेतील त्यांच्या एका भाषणादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि गौतम अदानी यांच्यातील संबंधांवरही प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सरकार गौतम अदानींना वाचवत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मात्र, आता समूहाने 20,000 कोटी रुपयांचा हिशोबच मांडला आहे.
20,000 कोटींचा हिशोब
अदानी समूहाचे म्हणणे आहे की, अबू धाबीची स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने (IHC) अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये $2.59 अब्ज (सुमारे 21,000 कोटी) गुंतवणूक केली आहे. समूहाच्या प्रमोटर्सनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमधील हिस्सेदारी विकून $2.78 अब्ज (सुमारे 22,700 कोटी रुपये) उभारले आहेत.
समुहाने जारी केलेल्या निवेदनात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, स्टेक विकून मिळालेली ही रक्कम नवीन व्यवसायाच्या विकासासाठी गुंतवण्यात आली होती. यासह, प्रमोटर्सनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या कंपन्यांच्या वाढीसाठी पुन्हा गुंतवणूक केली.
फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टचे खंडन
अदानी समूहाने आपल्या निवेदनात ‘फायनान्शिअल टाईम्स’च्या वृत्ताचेही खंडन केले आहे, जो राहुल गांधींच्या विधानांचा आधार आहे. याच अहवालात प्रश्न विचारण्यात आला होता की, अदानींच्या बेनामी कंपन्यांमध्ये अचानक 20 हजार कोटी रुपये आले कुठून? अदानी समूहाला पाडण्याची स्पर्धा असल्याचेही ते म्हणाले. तसेच, अदानी ग्रुप शेअर बाजाराशी संबंधित कायद्यांचे पूर्णपणे पालन करत असल्याचेही ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.