स्थैर्य, मुंबई, दि.८: भाजप जर शिवसेनेच्या मार्गाने चालला असता महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संपवण्याची भाषा झाली तेव्हा शिवसेना अधिक मजबूत झाली असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
1975 साली काँग्रेस नेत्या रजनी पटेल तर 1990 मध्ये बहुधा मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल, असे म्हटले होते. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीही याच गोष्टीचा पुनरुच्चार केला. मात्र, प्रत्येकवेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक जोमाने मजबूत झाली, असे संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय म्हणाले होते अमित शाह?
कणकवली येथील कार्यक्रमात अमित शाह म्हणाले की, ‘शिवसेना नेहमी म्हणत असते की, आम्ही वचन मोडले. पण, आम्ही वचन तोडले असे खोटे बोलत आमच्या मित्राने आमच्यासोबत दगाबाजी केली आहे. आम्ही महाराष्ट्रातसह देशभरात जे जे वचन दिले ते पूर्ण केले आहे. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिले होते. ते आम्ही पूर्ण केले. मी कोणतेही वचन हे सर्व जनतेसमोर देत असतो. तुम्ही राजकारणासाठी सिद्धांत मोडत आहात. आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही तुम्ही काळजी करु नका. आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असते तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती.’