स्थैर्य, औरंगाबाद, दि.३१: औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर महिला अत्याचाराचे आरोप झाले. संबंधित पीडितेने नोंदवलेला FIR सार्वजनिक कोणी केला, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. मी फिर्याद वाचली, अशी कबुली स्वतः मेहबूब शेख यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे ताबडतोब याविषयी गुन्हा दाखल केला पाहिजे.
आरोपीला राजकीय संरक्षण देणाऱ्या सरकारकडून पीडितेची फिर्याद सार्वजनिक झाल्यामुळे संबंधित महिलेच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला असेल याचा विचार हे संवेदनाशून्य सरकार करणार आहे का? की पीडितेच्या अशाप्रकारच्या गुन्ह्यातील पीडितेची ओळख सार्वजनिक करणे कलम 228 A नुसार गुन्हा आहे. पोलिसांकडे फिर्याद देताना महिलांनी कुणाच्या विश्वासावर आपली तक्रार द्यायची. साक्षीपुरावे, पुरावे सगळ्याची माहिती फिर्यादीतून मिळू शकते. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत फिर्याद गोपनीय ठेवतात. त्यात महिलेच्या अब्रूच्या रक्षणाच्या दृष्टीने फिर्याद सार्वजनिक होणे, अत्यंत दुर्दैवी आहे. गुन्हेगारांना मदत करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे का? संबंधित पीडित महिलेचे खच्चीकरण सरकारला करायचे आहे का? तिच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्यातून कोणाचे हित साधले जाणार आहे? असे सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहे.