दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
वरुणराजाने यावर्षी पाठ दाखवल्याने फलटण तालुक्यातील राजकीय वारसा असलेल्या आरडगाव या गावाला पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. गावाशेजारील असलेले लेंडीचे धरण व तांबवे धरण अक्षरशः पाण्याविना कोरडे पडल्याने कापडगाव, आरडगाव ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दहा दिवसातून एकदाच अर्धा तास पाणी नळाला येत असल्याने व तेही पुरेशे नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांना कोसो दूर भटकंती करावी लागत आहे. मध्यंतरी वरील विदारक परस्थितीची माहिती आमदार दिपक चव्हाण यांना आमच्या प्रतिनिधीने सांगितल्यानंतर दोन दिवसाला तीन टँकर पाण्याचे दिले गेले. मात्र, हे पाणीही पुरेशे नसल्याने अजून एका पाण्याच्या टँकरची वाढ करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
ग्रामपंचायतीमार्फत वाढीव पाणी टँकरसंदर्भात बीडीओ व तहसिलदार यांना पत्र देऊन आठ दिवस झाले तरी टँकरची वाढ न केल्याने प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.टंचाईच्या काळात लोकांना पाण्याची टंचाई न होऊ देणे, हे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे काम आहे, मात्र याकडे डोळेझाक का केली जातेय, याचीच चर्चा जनतेतून होत आहे.
निवडणूक आली की, सर्व पुढारी गावात मते मागण्यासाठी येतात. मात्र, अडचणीच्या काळात ते कधीही इकडे फिरत नाहीत. आज पाणी नसल्याने गावातील लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत, कोणी पाणी देता का हो पाणी, अशीच म्हणण्याची आज आरडगावकरांवर वेळ आली आहे.
संबंधित अधिकार्यांनी वरील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन वाढीव पिण्याच्या पाण्याचा टँकर त्वरीत सुरू करून पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
धोम-बलकवडीचे पाणी तांबवे धरणात सोडावे व तेच पाणी पोटफाटयाने लेंढीच्या धरणात सोडावे, म्हणजे जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.
– सुभेदार भोईटे, मा. सरपंच, आरडगाव