स्थैर्य, फलटण : कै. यशवंतराव चव्हाण, कै. वसंतदादा पाटील यांच्या नंतर दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा, राज्यसभा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या विषयी बोलताना भान ठेवून बोला असा खणखणीत इशारा महानंदा डेअरीचे उपाध्यक्ष डी. के पवार यांनी दिला आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेबाबत डी. के. पवार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
या वेळी बोलताना डी. के. पवार म्हणाले कि, देशाचे संरक्षण मंत्री शरद पवार यांनी उत्तमपणे जबाबदारी सांभाळली. त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. मराठवाडा विदयापीठ प्रश्न असो, धनगर समाजाला एन. टी. मध्ये समावेश करण्याचा प्रश्न असो, महिलांना राजकीय आरक्षण असो असे अनेक प्रश्न साहेबांनी कुशलतेने सोडवले आहेत. पडळकरांचे वक्तव्य अत्यंत बेजवाबदार व राजकीय हेतूने केले असल्याचे डि. के. पवार म्हणाले. प्रसिद्धीसाठी हापापलेल्या निष्क्रिय विचार शून्य प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत या पुढे जर असे व्यक्तव्य कोणी केले तर महाराष्ट्र शांत बसणार नाही, असेही डी. के. पवार यांनी स्पष्ट केले.