सत्तेतून नसल्यावर काही लोकांची विनाकारण तडफड होते – आमदार जयकुमार गोरे यांची विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२२ । सातारा । ज्याप्रमाणे माशाला पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याची तडफड होते तसे काही लोक सत्तेत नसले की त्यांची चांगलीच तडफड होते. त्यामुळेच कोण कुठे कुठल्या पक्षात जाते हे मला माहीत नाही. जे असा प्रयत्न करतायेत त्यांनी प्रत्यक्ष निवडणुका लढवून थेट निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यांचा नामोल्लेख टाळून दिले.

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक माण विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी प्रदेश कार्यकारिणीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सुवर्णा ताई पाटील जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेट वार शहराध्यक्ष विकास गोसावी विजय काटवटे तसेच कार्यकारिणीचे सर्व ज्येष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले यंदा देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. त्यामुळे हर घर झंडा अभियान देशभर राबवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला असून त्या पद्धतीने सातारा जिल्ह्यातही याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मंडल प्रमुख बुथ प्रमुख यांची यादी मागवण्यात आली असून त्यांना झेंड्याचे वितरण केले जाणार आहे. या अनुषंगाने कार्यकारिणीच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक घरांमध्ये झेंडा कसा पोहोचेल हे अभियानाचे मुख्य सूत्र असणार आहे. नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रवाद याची भावना वाढीस लागावी याकरिता हा केंद्राने उपक्रम निर्देशीत केल्याचे गोरे यांनी सांगितले.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर बोलण्याचे गोरे यांनी खुबीने टाळले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेमध्ये मला स्वारस्य नाही. माझी मतदारसंघातील विकास कामे पूर्ण करणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुन्हा तेच तेच विषयांची चर्चा कशासाठी असाच त्यांनीच प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात प्रसारित झालेल्या या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी यांना छेडले असता ते म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते कोणाचे जावई आहेत ते मला माहित नाही. काही लोकांची सत्तेशिवाय प्रचंड धडपड होते. एखादा मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर त्याची जी अवस्था होते तीच अवस्था काही लोकांची घडते. त्यांनी आधी सत्ता सोडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवून निवडून येऊन दाखवावे आणि मग कोठे कोणत्या पक्षात जायचे हे ठरवावे, असे थेट आव्हान जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता दिले.

आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने साताऱ्यात भाजपची भूमिका स्वबळावर असणार का त्यावर गोरे म्हणाले की भाजपचे जिल्ह्यात स्वबळावर आणि कमळाच्या चिन्हा वरच लढण्याची तयारी आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपचेच आहेत. त्यामुळे आम्ही सर्व एकच आहोत. त्यांच्या आमच्यात गट पाडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. पालिका निवडणुकांच्या वेळी साताऱ्यात काय निर्णय घ्यायचा हे आम्ही पक्ष कार्यकारणीशी चर्चा करून ठरवू असे गोरे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!