दैनिक स्थैर्य । दि. १६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । पोलिस हे खरे समीक्षक आहेत. ते आपल्या सेवेत दोन्ही बाजूचा सारासार विचार करुन निर आणि क्षीर वेगळे करणारे राजहंस असतात. सेवा परमो धर्म या उक्तीने जीवनाची वाटचाल करीत असताना ताणतणाव याला सामोरे जाताना हास्य शिदोरी बरोबरच घेऊन जावी, असे अनमोल मार्गदर्शन ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पोलिस प्रशिक्षण केंद्र नानवीज ता.दौंड येथे ३० वर्ष सेवापूर्ती अमंलदार प्रशिक्षण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे सर बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक बुरहण, संयोजक पोलिस निरीक्षक देवकर, पोलिस निरीक्षक वाघ, डीआय अरविंद पाटील व सर्व कर्मचारी वर्ग तसेच महाराष्ट्रातील ३० वर्ष सेवा पूर्ती अमंलदार प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
प्रा.कोकरे यांनी हास्यकल्लोळ कार्यक्रमात सांगितले, पोलिस सेवा ही वर्दीतील मनुष्यत्व जागं करणारी आहे. सेवा करताना ताणतणाव येतो. त्याला सामोरे जाताना शरीरस्वास्थय संभाळावे. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्यावा. आपले छंद आवडी निवडी जोपासून मनमुराद जीवनाचा आनंदा घ्यावा.” प्रा.कोकरे सरांनी अनेक ग्रामीण जीवनातील अस्सल मराठमोळं विनोद सांगून सर्वांना हास्यसागरात चिंब भिजवून टाकले. तसेच हसता हसता सर्वाना अंतर्मुख केलं.