दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२४ | फलटण |
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फलटणच्या राजे गटाने महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांच्यासोबत न जाण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अकलूजच्या धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सर्व यंत्रणा राबवली. राजे गटाने माढ्याचे विद्यमान खासदार व भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी धैर्यशील मोहिते-पाटील यांना आपली संपूर्ण ताकद दिली. त्यामुळे राजे गटाची ही महायुतीतील बंडखोरीची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार का? याकडे आता फलटण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर माढा लोकसभेसाठी महायुतीकडून फलटणच्या श्रीमंत रामराजे व राजे गटाने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले. मात्र, अखेर महायुतीकडून अर्थात भाजपाकडून खासदार रणजितसिंह यांना माढ्याचे तिकिट मिळाले. त्यानंतर श्रीमंत रामराजे व राजे गटाने खासदार रणजितसिंह यांचे तिकिट रद्द करण्यासाठीही प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्नही फोल गेले. दरम्यान, अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील खासदारकीला इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनीही खासदार रणजितसिंह यांचे तिकिट रद्द करून ते आपल्याला मिळावे, यासाठी बंडखोरी करण्याची भूमिका घेत रान उठविले. मात्र, त्यांचेही भारतीय जनता पार्टीने न ऐकल्यामुळे अखेर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी बंडेखारी करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे हातमिळवणी केली. शरद पवार यांनी ही संधी साधून लागलीच धैर्यशील मोहिते-पाटील यांना आपल्या पक्षातून उमेदवारी जाहीर करून मोठा डाव साधला. धैर्यशील मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फलटणच्या श्रीमंत रामराजे व संपूर्ण राजे गटाने आपले संपूर्ण समर्थन धैर्यशील मोहिते-पाटलांना जाहीर केले. राजे गटाची ही महायुतीतील बंडखोरीची भूमिका महायुतीला जबर झटका देणारी होती. राजे गटाच्या समर्थनामुळे धैर्यशील मोहिते-पाटील यांची बाजू मजबूत होऊन माढ्याची निवडणूक अटीतटीची बनली.
वास्तविक पाहता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. लोकसभेला महायुतीच्या विरोधात घेतलेली भूमिका पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे व फलटणचा संपूर्ण राजे गट हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जाणार, की ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा सक्रियपणे काम करणार, याकडे आता तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळावा होणार आहे. या मेळाव्यास श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपक चव्हाण यांची उपस्थिती दिसणार का? हेही पाहावे लागणार आहे. तसेच श्रीमंत रामराजे व राजे गटाने लोकसभेला महायुती धर्माचे पालन केले नाही, यावरही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून काय कारवाई होणार, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.