दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । बारामती । उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडवणीस यांना माध्यमांनी विरोधी पक्षनेते अजित पवार विरोध करीत नसल्याचा प्रश्न विचारला होता.या पार्श्वभुमीवर पवार यांनी फडवणीस यांचे नाव न घेता त्यांची भूमिका मांडली. विरोध आहे म्हणून आता काय मी त्याचे गचुरे धरू की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल असं पवार यांनी यावेळी सांगितले. बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते.
पवार म्हणाले, विशिष्ठ नेत्यांना तीव्र विरोध करत नाही, सॉफ्ट भूमिका घेतो, असा आरोप केला जात आहे. हा आरोप मला मान्य नाही. मी सभ्यता पाळतो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ती शिकवण आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण,ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्याचे काम केले. विरोध म्हणून आता काय मी त्याचे गचुरे धरू की मारामारी करू, म्हणजे मी विरोध केल्यासारखे दिसेल, असे सांगून पवार म्हणाले. विरोधक म्हणून काही सभ्यता आम्ही पाळली पाहिजे. चुकीचे बोलून काय साध्य होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही राजकीय जीवनात अनेकदा आरोप झाले. पण त्यांनी विकासावरच बोलणे सुरु केले. खैरनार यांच्यापासून अनेकांनी त्यांच्यावर आरोप केले. दाउदशी संबंध जोडले. पप्पू कलानीचे नाव घेतले, एन्रॉनच्या बाबतीच नको तितकी बदनामी केली. मात्र,पवारसाहेबांनी त्यांचा तोल कधीच जावुन दिला नाही. शेवटी लोक गोड फळे असणाऱ्या झाडालाच दगड मारतात. कडू फळे असणाऱ्या झाडाकडे पोपटसुद्धा जात नाही. मी माझ्या हाती असलेल्या संसदीय आयुधांचा वापर करत विरोधकांना कोंडीत पकडतो. त्यामुळे मी विरोधकांबाबत सॉफ्ट भूमिका घेतो, हा आरोप मला मान्य नाही. विधीमंडळात मी विरोधी पक्षनेता म्हणून अनेक विषयांवर आवाज उठवतो. इतर राज्यात विधानसभेत एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, खुर्च्या फेकणे, वाईट बोलणे ते अगदी मारहाणीपर्यंतच्या घटना घडल्या आहेत, या पद्धतीने विरोध मला अजिबात मान्य नाहि,अशा शब्दात अजित पवार यांनी फडवणीस यांच्याबाबत सॉफट कॉर्नरच्या आरोपांना उत्तर दिले.