मागल्या पन्नास वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी देखील अनेकदा युद्धपातळीवर काम चालले आहे, किंवा व्हायला हवे, अशी भाषा वापरली आहे. पण व्यवहारात ह्या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, त्याचा अंदाजही मला नव्हता. आज कोरोनाच्या कृपेने त्याची अनुभूती येत आहे असे म्हणायला हरकत नाही. याचे कारण एका विद्यमान सेनाधिकारी व्यक्तीने जनता कर्फ़्यु किंवा नंतरचा लॉकडाऊन सुरू होण्यापुर्वी केलेले भाष्य आहे. माझ्या निकटवर्तियांशी संबंधित या अधिकार्याने येऊ घातलेल्या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले होते, या किंवा आधीच्या पिढीने जे बघितलेले वा अनुभवलेले नाही, त्या अनुभवातून आपण पुढला काही काळ जाणार आहोत. त्याचा अर्थ आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर नसलो तरी व्यवहारी युद्धजन्य परिस्थितीत असणार आहोत, असा होता. पण तो आशय मलाही तेव्हा कळला नव्हता आणि सर्वसामान्य जनतेला समजणेही अशक्य होते. किंबहूना आज विविध राज्यात वा प्रशासनात कार्यरत असलेल्या अनेक उच्चपदस्थ व्यक्तींनाही त्याची जाणिव झालेली नसावी. युद्धपातळी म्हणजे तिथे चर्चेला वा विचारविनिमयाला वेळ नसतो, सेनापतीने आदेश दिला मग त्याची चिकित्सा करून पुढे जाता येत नाही. तर संकट वा मृत्यू समोर दिसत असतानाही भावना किंवा शंका गुंडाळून पुढे जायचे असते आणि प्रसंगाशी सामना करायचा असतो. त्यात आपलाही कपाळमोक्ष होऊ शकतो. पण एकूण समाजाच्या भल्यासाठी तितका त्याग करणे अपरिहार्य असते. त्यात शंका घेणे वा प्रश्न विचारणेही गैरलागू असते. तितकी शिस्त अंगी बाणलेली असेल तरच युद्ध लढता येत असते आणि जिंकताही येत असते. कारण नेहमीच्या व्यवस्था व सुविधांचा अभाव असतानाही समोर येईल त्या प्रसंगाशी झुंजण्याला पर्याय नसतो. आज या बिगरसैनिकी युद्धात म्हणूनच सर्वांचा पुरता गोंधळ उडालेला आहे. ते युद्ध लढत आहेत आणि रणभूमीवर आहेत. पण युद्ध कुणाशी व कशासाठी याची साधी जाणिव कोणापाशी दिसत नाही.
कुठल्याही संस्था संघटनेत वा कुटुंब परिवारातही सर्व बाबतीत एकवाक्यता नसते. पण हे सर्व मतभेद बेबनाव युद्ध सुरू झाल्यावर बाजूला ठेवुन चालावे लागते. त्यात जो सेनापती असतो त्याच्या आदेशावर विश्वास ठेवूनच चालायचे असते. त्यातले दोष वा आक्षेप घेण्याने अधिक नुकसान संभवत असते. उलट सेनापतीने सर्व वादविवाद गुंडाळून आपल्या सहकारी सोबत्यांशी सल्लामसलत करून पाऊल उचलायचे असते. दिल्लीत बसलेला सेनापती लडाख वा काश्मिरातील आपल्या सहकारी सैनिकांना आदेश देतो, तेव्हा त्याच्या आदेशावर शंका घेऊन चालणार नसते. काही प्रमाणात स्थानिक सेनाधिकारी व्यवहारी निर्णय घेत असतात. त्यात आपल्या निर्णयाचा खुलासा वा विवरण प्रत्येक सैनिकाला देत बसल्यास युद्ध संपून गेले तरी चर्चा संपत नसतात. कारण शत्रू बाजी मारून जातो आणि युद्ध न लढताच हरल्याने पुढल्या चर्चेची गरज उरत नसते. बांगला देशचे युद्ध इंदिराजींनी कशाला पुकारले किंवा बांगला देशात पाक सेनेने शरणागती पत्करल्यावर युद्धबंदी अकस्मात कशाला घोषित केली, त्याविषयी जाब त्यांना कोणी कधी विचारला नाही. राजकीय विरोधकांनी विचारला नाही, किंवा सेनादलाच्या प्रमुखांनी देखील विचारला नाही. जनरल कॅन्डेथ नावाच्या पश्चीम सीमेवरील अधिकार्याने तसा संतप्त सवाल केला, त्याला तात्काळ निवृत्त करण्यात आलेले होते. आज बघितल्यास त्याची शंका वा आक्षेप रास्त ठरूही शकतो. कारण पश्चीम पाकवर तेव्हा हल्ला थांबवला नसता, तर हाती आलेला पाकप्रदेश अधिक विस्तारून नंतर बदल्यात सगळा काश्मिर परत घेऊन सौदा करता आला असता. आज पाकव्याप्त काश्मिर हा विषय शिल्लक उरला नसता, किंवा त्यावरून इतकी हिंसा व घातपात भारताला अनुभवावे लागले नसते. पण ही चर्चा आज रंगवणे व तेव्हा त्यावरून गहजब करणे, यात फ़रक असतो. म्हणून त्यावेळी कोणी सेनाधिकारी कॅन्डेथ यांच्या समर्थनाला पुढे आले नाहीत. कारण निर्णयप्रक्रीया युद्धपातळीवर चालली होती. तिथे वादविवादाला स्थान नसते.
कोरोना विरोधातल्या लढाईत सगळे नागरिकच सैनिक आहेत आणि आपापल्या पातळीवर लोकप्रतिनिधीच त्यांचे सेनापती आहेत. स्थानिक वरीष्ठ कनिष्ठ प्रशासकीय अधिकारीही सामान्य जनतेचे सेनापती आहेत. त्यांच्या आज्ञा पाळणे व पर्याय निघण्यापर्यंत होणारे हाल सहन करण्याला पर्याय नसतो. अशाही स्थितीत लॉकडाऊन झाला तर अनंत अडचणींना नागरिकांना त्रास सहन करावा लागणे अपरिहार्य होते. इवल्या जागेत दहापंधरा लोक वास्तव्य करतात, अशा मुंबईत झोपडपट्ट्य़ा वस्तीमध्ये सोशल डिस्टंसिंग शक्य नव्हते. पण तिथे अपुर्या जागेतही रोगाला विषाणूला फ़ैलाव होण्यापासून रोखण्यासाठी पर्याय शोधले जाऊ शकत होते. तसे काही करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी माध्यमांची पत्रकारांची होती. अगदी पुरेसे खाणेपिणे धनधान्य हाताशी नसतानाही कळ काढायला लोकांना प्रवृत्त करणे, ही विश्लेषक पत्रकारांची जबाबदारी होती. ती सुद्धा युद्धभूमीच होती. सैनिक ३६-४० तास अथक भुकेलाही काम करतो. विश्रांतीची अपेक्षाही बाळगत नाही. त्याला युद्धपातळी म्हणतात. पुरात भूकंपात निवारण कामासाठी सैनिक आणले जातात, तेव्हा त्यांचे कष्ट अतुलनीय भासतात. पण त्यातली अनुभूती कधी नागरी जीवनातल्या सुविधांनी लंगडे झालेल्यांना असते काय? नसते म्हणूनच लॉकडाऊनचा फ़ज्जा उडालेला आहे. सगळे जीवन आणि देशच युद्धभूमी झालेले असताना कायदे नियम वा शिस्त बेशिस्त यांना अर्थ उरलेला नसतो. त्यातून प्रत्येकजण वाट शोधण्याचा प्रयास करीत असतो. तेव्हा पोलिस वा सार्वजनिक सेवेतील कोणी कर्मचारी अमानुष वागला वा त्याच्या मनाचा अतिकष्टाने तोल गेला, तर राईचा पर्वत करू नये. इतकेही भान ठेवले जात नाही? मृतदेहाच्या बाजूला रुग्णावर उपचार चालल्याचे चित्रण व्हायरल करून दोन महिने अहोरात्र राबलेल्या डॉक्टर कर्मचार्यांना आरोपी बनवले जाते, तेव्हा युद्धपातळीचा अर्थ समजला नाही असाच अर्थ होतो. कारण आजची परिस्थिती नेहमीची वा सुटसुटीत नाही. इथे अनेक नियम बाबी गुंडाळून जमेल तितके करायचे आहे. हे लोकांच्या डोक्यात कोणी घालायचे असते?
कपडे फ़ाटले तर ते सुईदोरा घेऊन शिवता येतात, किंवा ठिगळ लावूनही झाकपाक करता येते. पण आभाळच फ़ाटले तर ते शिवायला सूईदोरा कुठून आणायचा? अशी परिस्थिती समोर आहे. तिथे कशाला सुई म्हणायचे आणि कशाला दोरा म्हणायचे, तेही सांगता येणार नाही. पण आभाळ फ़ाटले हा नुसता शब्द असेल तर त्याला काही अर्थ नसतो. त्यातला आशय लक्षात घेतला तर विषय समजू शकतो. अन्यथा युद्धपातळीवर हा शब्द नुसता निरर्थक म्हणूनच वापरला जात रहाणार. युद्धात सैनिक सीमेवर किंवा रणांगणात लढतो, तेव्हा त्याला शक्य तितके सामान साहित्य पुरवण्याची व्यवस्था शासन व त्यांचे इतर विभाग करीत असतात. पण जेव्हा असे सैनिक लढताना शत्रू प्रदेशात किंवा वेढ्यात सापडतात, तेव्हा त्यांना आपल्याच बळावर प्रतिकार करण्याखेरीज पर्याय नसतो. उपलब्ध साहित्य व साधनांचा मिळेल तसा वापर करून झुंज द्यावी लागत असते. त्याला युद्धपातळीवरचे काम म्हणतात. आज विविध इस्पितळे, शासकीय यंत्रणा, पोलिस वा सफ़ाई कामगार इत्यादी आपल्या परीने अथक काम करतात, तेव्हा त्यांना अशा विपरीत स्थितीतही काम करण्याचे कुठलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. २०-२५ पोलिसांचा त्यात बळी गेला आहे. तेही आपल्या घरात कुटुंबात लॉकडाऊनमध्ये सुरक्षित जगू शकले असते. पण त्यांनी पुढे येऊन एकूण समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावलेले आहेत. अमोल कुलकर्णी नावाचा धारावीमध्ये बंदोबस्ताला अखंड राबलेला पोलिस अधिकारी काही दिवस आधी सोशल मीडियातून म्हणाला होता. ‘कोणी ५ कोटी तर कोणी ५० कोटी देणग्या दिल्यात कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी. आम्ही आमच्या प्राणांची देणगी देतोय’. त्याचे शब्द गेल्या आठ्वड्यात खरे झाले. या युद्धपातळीने त्याचे ‘दान’ घेतले. कोरोनाच्या निमीत्ताने किती संपादक, पत्रकार, बुद्धीजिवी, अर्थशास्त्री वा तथाकथित शहाण्यांपासून राजकारण्यांपर्यंत लोकांनी कोरोनाच्या निमीत्ताने कसले दान केले आहे? कारण युद्धपातळी म्हणजे काय ते समजून घेण्यापर्यंतही त्यांच्या बुद्धीची पातळी गेलेली नाही.